जालन्यातील मृत्यूदर कमी होण्यासाठी प्रयत्न करा -पालकमंत्री टोपे यांचे निर्देश

जालना, दि. 31 (जिमाका):- जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचा प्रमाण चांगले असले तरी मृत्यू दर कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांबरोबरच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती निमा अरोरा, टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडीत, डॉ. आनंद निकाळजे, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, डॉ. श्रीमती पद्मजा सराफ, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, डॉ. कडले, डॉ. घोडके, डॉ. संजय जगताप, कल्याण सपाटे, जालना येथील इंडीयन मेडीकल असोसिएशनचे तज्ञ्ज डॉक्टर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणुने बाधित झालेल्या रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार देण्यासाठी सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत असले तरी जिल्ह्यातील मृत्युचा दर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी टेलिआयसीयुसह इतर सुविधा जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून रुग्णांवर उपचारासाठी मुंबई, दिल्ली येथील डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. जिल्ह्यात असलेल्या आयएमएच्या तज्ज्ञ डॉक्टरांचीही रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत घेण्याबरोबरच कोरोनाबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये भिती बसलेली असुन रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांचे समुपदेशही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. राहुल पंडित यांनी आज जालना येथील जिल्हा रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची तपासणी केली. जिल्ह्यातील कोविड बाधितांवर उपचारासाठी श्री. पंडित यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असल्याचे सांगत रुग्णांच्या तपासण्या, रेमेडिसेंविर औषधाचा वापर, रुग्णांना योग्य औषधे देणे याबाबतीमध्ये श्री. पंडित यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र असा इन्टेन्सिव्ह केअर विभाग उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून आय. सी.यु. मधील सर्व डॉक्टर,नर्सेस यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. जालन्याला आरोग्य क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी श्री. पंडित यांच्या भेटीचा मोठा उपयोग होणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

ऑक्सीजन प्लांटचा शुभारंभ

जालना येथील जिल्हा रुग्णालय मध्ये उभारण्यात आलेल्या 20 के.एल. क्षमता असलेल्या ऑक्सीजन प्लांटचा डॉक्टर राहुल पंडित यांच्या हस्ते ‍फित कापुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. निकाळजे, डॉ. संजय जगताप, डॉ. घोडके,आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले जालना येथे यापूर्वी 20 के. एल. क्षमतेच्या प्लांटची उभारणी करण्यात आली असून आज नव्याने 20 के. एल.क्षमतेच्या प्लांटचा शुभारंभ करण्यात आला आहे.रुग्णालयात असलेल्या 500 बेडसना पूर्ण क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.