देशासाठी निःस्वार्थ सेवेचा वारसा जपणाऱ्या नेत्याला ‘राष्ट्रीय एकता दिवसाच्या’ रुपाने समर्पक आदरांजली – प्रा. सुधीर गव्हाणे

मुंबई, 31 ऑक्टोबर 2020

सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती आज, 31 ऑक्टोबर रोजी देशभर ‘राष्ट्रीय एकता दिवस’ रुपाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी पत्र सूचना कार्यालय आणि रिजनल आऊटरीच ब्युरोने राष्ट्रीय एकता दिवस डिजीटल स्वरुपात साजरा करत ‘भारताच्या एकत्रिकरणात सरदार पटेल यांची भूमिका’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन केले होते.

वेबिनारची सुरुवात माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या गीत आणि नाट्य विभागाने रचलेल्या ‘एकता गीताने’ झाली, त्यानंतर ‘एकता शपथ’ घेण्यात आली.  

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगरु प्रा. सुधीर गव्हाणे यांनी सरदार पटेल यांच्या नेतृत्वाच्या पैलूंविषयी सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, सरदार पटेल, जे महात्मा गांधींचे उत्तम अनुयायी होते, हे तळागाळातील नेते आणि महान संघटक होते. त्यांना जनभावनेची जाण होती. प्रा. गव्हाणे यांनी स्वातंत्र्यानंतर अवाजवी शक्तीचा वापर न करता भारताच्या एकत्रिकरणासाठी सरदार पटेल यांनी दाखवलेल्या नेतृत्वगुणाची माहिती दिली. त्यांनी लोहपुरुष पटेल यांचे ‘राजकीय संन्याशी’ असे वर्णन केले आणि सत्तेच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा करण्याचे, राष्ट्र-उभारणीचे, राष्ट्रासाठी नि:स्वार्थ सेवा आणि नेतृत्वशक्तीच्या वारसाचे त्यांनी उदाहरण घालून दिले, असे सांगितले. सरदार वल्लभाई पटेल यांनी दूरदृष्टी, कार्यकुशलता आणि दृढतेने 500 संस्थानांचे विलीनीकरण केले हे भारतीय इतिहासातील अतुलनीय यश आहे.   

सरदार पटेल यांच्या आर्थिक दूरदृष्टीचा समकालीन संदर्भ सांगताना पश्चिम विभाग, पत्र सूचना कार्यालयाचे महासंचालक मनीष देसाई यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर जेंव्हा आपल्या शेजारी राष्ट्राने व्यापार कराराचा सन्मान ठेवला नाही, आपल्याला ज्यूट पुरवठा केला नाही, त्यावेळी सरदार पटेल यांनी सांगितले, “जर ते कराराची अंमलबजावणी करण्याची हमी देत नाहीत, तर आपण ज्यूट, कापूस आणि आपल्याला लागणाऱ्या अन्नधान्याचे उत्पादन घेऊ”. हा आत्मनिर्भर भारताचा प्रारंभिक पाया आहे, असे ते म्हणाले. सरदार पटेल यांच्या आर्थिक तत्त्वज्ञानाचा मुख्य सिद्धांत स्वावलंबन हा होता आणि अर्थशास्त्र म्हणजे त्यांच्यासाठी अत्यंत व्यावहारिक विज्ञान होते. सरदार पटेल यांना भारतीय अर्थव्यवस्था, वाढीव औद्योगिक आणि कृषी उत्पादन आणि वाढीव संपत्तीच्या निश्चित पायावर उभी राहावी, असे वाटत होते. त्यांच्या निधनाच्या अनेक दशकानंतरही ‘नव भारत’ निर्माण करणाऱ्या सर्वांचे ते प्रेरणास्थान आहेत, असे मनीष देसाई म्हणाले.  

उपसंचालक डॉ राहुल तिडके यांनी आजच्या विषयाचे प्रास्ताविक केले आणि आजचा विषय, त्याचा उद्देश आणि प्रासंगिकता याविषयी विवेचन केले. रिजनल आऊटरीच ब्युरोचे सहायक संचालक निखील देशमुख यांनी सर्व वक्त्यांचे आणि वेबिनार यशस्वी करण्यासाठी सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानले. पत्र सूचना कार्यालय, मुंबई कार्यालयाच्या सोनल तूपे यांनी वेबिनारचे सुत्रसंचालन केले.