नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही-महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

रत्नागिरी दि. 31: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. पंचायत समिती सभागृह मंडणगड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, खार जमीन विकास करण्याच्या दृष्टीने सकारात्मक  पाऊल उचलण्यात येत आहे. हर्णे, बाणकोट, बुरोंडी यासारख्या बंदरांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. जांभा दगड बंदी उठवण्याबाबतचा अंतिम निर्णय झाला असून लवकरच याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येतील  असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पंचायत समिती मंडणगडच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी तसेच ग्रामीण भागातील जोडरस्ते दुरुस्तीसाठी लवकरच निधी दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. सत्तार यांनी हर्णे बंदराची पाहणी केली.  हर्णे बंदरावर जेट्टी उभारण्याच्या  स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीचा विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आंजर्ले खाडीतील गाळ काढण्याची कार्यवाही केली जाईल. तुळशी येथील महिला बचतगटांना भेट देऊन बचतगटाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हळद लागवडीची पाहणी केली. मंडणगड तालुक्यातील आंबडवे या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी भेट देऊन तेथील समस्या त्यांनी जाणून घेतल्या.  यावेळी त्यांनी याकुब बाबा दरगाहला भेट दिली तसेच आडखळ खाडीची पाहणी करुन खाडीमध्ये साचलेला गाळ उपसून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेणार – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेणार – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

रत्नागिरी दि. 31- कोरोना महामारीचे संकट संपल्यावर जिल्ह्याला पायाभूत, मुलभूत सुविधांकरिता ग्रामविकास खात्यामार्फत भरघोस निधीची उपलब्धता करुन देण्यात येणार असून कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.  म्हाप्रळ – आंबेत पुलावरील वाहतुकीस पर्याय देणाऱ्या फेरीबोटीच्या जेटीचे कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते म्हाप्रळ येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

सावित्री नदीवरील म्हाप्रळ – आंबेत पुल नादुरुस्त झाल्याने सध्या अवजड वाहतुकीस बंद आहे. पुलाचे सदृढीकरणाचे काम सुरु असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याने म्हाप्रळ पंचक्रोशीतील नागरिकांची पुलाअभावी मोठी अडचण होणार ही बाब लक्षात घेतल्याने पुलाचे काम सुरु असतानच तात्काळ उपाययोजना म्हणून म्हाप्रळ आंबेत फेरी बोट सुरु करावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीच्या अनुषंगाने  पाहणी करुन बोटीसाठी म्हाप्रळ व आंबेत अशा दोन्ही ठिकाणी जेटीची आवश्यकता व्यक्त केली होती. ग्रामस्थांची ही मागणी मान्य होऊन जेटीसाठी निधीची तरतूद झाल्याने  श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत जेट्टीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार योगेश कदम, पंचायत समिती सभापती स्नेहल सकपाळ, उपसभापती प्रणाली चिले, तसेच शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.