सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात केलेले काम प्रशंसनीय – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिंधुदुर्गनगरी दि.31: सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात केलेले काम प्रशंसनीय असून कोरोनाला बऱ्यापैकी प्रतिबंध केला आहे. आरोग्य यंत्रणेसोबत इतर यंत्रणांनीही अहोरात्र कष्ट करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही कोरोना अजून संपला नाही. कोरोना संपवण्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे.अशा सूचना महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित केलेल्या अधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी,खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक,  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर,अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल फाटक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, दीपाली पाटील, कुडाळ गट विकास अधिकारी विजय चव्हाण, जि. प. कार्यकारी अभियंता बांधकाम अनामिका जाधव विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले,  सध्या आपण कोरोना साथीबरोबर झुंज देत आहोत त्याचबरोबर विकास कामेही करणे आवश्यक आहे. जनतेला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढत त्यांच्या समस्याही सोडविल्या पाहिजेत. महसूल व ग्रामविकास विभाग हा जनतेच्या जीवनाशी निघडीत विभाग आहेत या विभागाकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कामे  तातडीने केली जावीत, जनतेच्या कामाला प्रशासनाने प्राधान्य द्यावे.असे सांगून राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास कामाचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तातडीने तयार करावेत या कामाला प्राधान्य द्यावे. यावेळी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा, परतीच्या पावसाने झालेले नुकसान, जि. प. अंतर्गत येणारे रस्ते, माझे कुटुंब, माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण, वाळू लिलाव याबाबत आढावा राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी घेतला.