लातूर जिल्ह्यातील सर्व जनावरांचे टॅगिंग करून ओळखपत्र देण्यात यावेत- संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर/उदगीर, दि.26:- राज्यात पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व जिल्ह्यात जनावरांचे टॅगिंग करून जनावरांना ओळखपत्र देण्याची मोहीम सुरू आहे ही मोहीम माणसाच्या आधार कार्ड प्रमाणे असणार आहे या मोहिमेअंतर्गत विशेषत: गाय व म्हैस या दुधाळ जनावरांच्या कानाला टॅगिंग करून त्या जनावराचे ओळखपत्र संबंधित मालकाला देण्याची मोहीम लातूर जिल्ह्यात सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व जनावरांना टॅगिंग  करून तात्काळ ओळखपत्र देण्यात यावेत, असे आवाहन संसदीय कार्य, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.         

उदगीर तालुक्यातील चिमाचीवाडी येथे आयोजित पशु आधार नोंदणी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, बस्वराज पाटील नागराळकर, माजी सभापती कल्याणराव पाटील, पंचायत समितीचे सदस्य माधव कांबळे, धुप्पे नाना, गटविकास अधिकारी श्री सुळे, चिमाचीवाडीचे सरपंच श्री बंडे, तालुका पशुधन विकास अधिकारी संतोष केंद्रे व अन्य उपस्थित होते.       

उदगीर तालुक्यात जवळपास अडतीस हजार जनावरांची नोंदणी झालेली असून त्यापैकी गाई-म्हशी या जनावरांच्या कानाला टॅगिंग करण्यात येत असून तात्काळ त्यांना ओळखपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी केंद्रे यांनी दिली.  तालुक्यात जवळपास 20 हजार गायी-म्हशी असून त्यातील 9 हजार 97 जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली तर उर्वरित सर्व जनावरांचे टॅगिंग लवकरात लवकर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.      राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व जिल्ह्यात जनावरांना टॅगिंग करण्याची मोहीम सुरु करण्यात आलेली असून याअंतर्गत माणसाला ज्या प्रमाणे आधार कार्ड देण्यात येते त्याप्रमाणेच दुधाळ जनावरांची संपूर्ण माहिती एकत्रित करून त्यांच्या कानाला टॅगिंग करून सर्व माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या जनावरांची सर्व माहिती व मालकाचे नाव, ते जनावर किती दूध देत होते, दुध देण्याचा कालावधी किती होता, त्या जनावरास कोणते आजार होते, त्यावर कोणते उपचार झालेले आहेत या बाबीची सर्व इत्थंभूत माहिती या ओळखपत्रात उपलब्ध असणार आहे, असे डॉक्टर केंद्रे यांनी सांगितले.
​उदघाटन ​:पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती उदगीर तर्फे 25 ऑक्टोबर 2020 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे  यांच्या हस्ते आधार कार्डच्या धर्तीवर जनावरांचे ओळखपत्र तयार करण्यासाठी जनावरांचे कानावर टॅगिंग करून ओळखपत्र तयार करण्याच्या कार्यक्रमाचे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 हंडरगुळी  अंतर्गत मौज़े चिमाचीवाडी येथे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक श्री सर्कलवाड व  परिचर श्रीधर सुर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास चीमाचीवडी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.