बाभळगावच्या दसऱ्याची परंपरा

लातूर ,दि.२५ ऑक्टोबर :बाभळगावच्या दसऱ्याची परंपरा सर्वश्रुत आहे.याबद्दल सांगत आहेत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख. त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आले.

धीरज यांच्याच शब्दांत :लहान असताना आजोबांसोबत व नंतर साहेबांसोबत बाभळगावचा दसरा साजरा करत असताना त्या परंपरेचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. ऐतिहासिक अशी परंपरा जपत आज विधिवत पूजन करीत देशासमोरील सगळी संकटे दूर होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे, सर्वांचे आयुष्य पुन्हा सोन्यासारखे झळाळू दे, अशी प्रार्थना आम्ही केली.दसरा हा प्रत्येक वाईट वृत्तीला पराभूत करायचा दिवस. याचे औचित्य साधून विजयाच्या क्षणी साथ देणाऱ्या अश्वाची आज आईंच्या आणि माझ्या हस्ते पूजा झाली.

निष्ठा, शक्ती यांचे प्रतीक म्हणून अश्वाची पूजा करण्याची परंपरा आहे. अश्वपूजनाबरोबरच देवता, गुरुजन, शस्त्र, धान्य याचेही पुजन केले.सध्या आपल्यासमोर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे यंदाचा दसरा साधेपणाने साजरा करत आहोत. मात्र, कोरोनारुपी रावणाला हरवण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टनसिंग या शस्त्रांचा आपण वापर करावा. कोरोना कमी झाला म्हणून निष्काळजीपणा करू नये. आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन मी सर्वाना करतो.

बाभळगावचा दसरा साहेबांनी कधीही चुकवला नाही – श्री.तुकाराम सखाराम पिटले, माजी सदस्य ग्रामपंचायत, बाभळगाव.

गावपातळी पासून ते राज्य व देशाच्या स्तरावर विलासराव देशमुख साहेबांनी यशाचा आलेख चढता ठेवला. कितीही मोठ्या पदावर ते पोहोंचले अथवा कितीही ते व्यस्त असले तरी साहेबांनी बाभळगावचा दसरा कधी चुकवला नाही. हे आम्ही पूर्वी पासून पाहत आलो आहोत. दसऱ्याच्या दिवशी साहेब कुठे असतील तर ते बाभळगावात हे देशभरात सर्वांनाच माहित होते. बाभळगावचा दसरा नावारूपाला आला तो साहेबांमुळेच. एक दसरा असा देखील होता कि दसऱ्याला साहेब बाभळगावला आले नव्हते. मात्र याचा सर्वाना अभिमान वाटत होता. कारण साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.आम्ही बाभळगावकर दसऱ्याच्या दिवशी आवर्जून साहेबांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी जात होतो. ही आमची परंपरा बनली होती. साहेबांमुळेच मला बाभळगावात ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करता आले. दिलीपराव साहेब तेंव्हा सरपंच होते. साहेब परिवहन मंत्री असताना माझ्या मुलास नोकरी मिळावी यासाठी मुंबईला मी गेलो होतो. तेंव्हा साहेबांनी माझ्या विनंतीस मान देऊन मुलास नौकरी दिली. प्रत्येक दिवाळीस साहेब आवर्जून आमच्या घरी येत असत. याचा आम्हाला अभिमान वाट होता. परंपरा जोपासण्यासाठी साहेब सतत प्रयत्नशील असत.साहेबांच्या व्यक्तिमत्वातील हा खूप मोठा गुण होता.