लॉकडाऊनच्या काळात सायबर संदर्भात ४५० गुन्हे दाखल

STAY CYBER SAFE ADVISORY

ठाणे शहरात नवीन गुन्ह्याची नोंद

मुंबई,  दि.१ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४५०  गुन्हे दाखल झाले असून २३९ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४५० गुन्ह्यांची (ज्यापैकी २७ N.C. आहेत) नोंद ३१ मे २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८६ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टीकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३९ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

ठाणे शहर

ठाणे शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे या परिसरातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १४ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीबाबत चुकीची माहिती व सरकारी उपाय योजनांबाबत आक्षेपार्ह मजकूर असणारी पोस्ट शेअर केली होती, त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये सरकारी उपाययोजनांबाबत गैरसमज पसरून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.

सायबर भामट्यांपासून सावध

सध्या लॉकडाउनच्या काळात काही नागरिकांना नोकरी कपातीला सामोरे जावे लागत आहे, तर बऱ्याच लोकांना पगार कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या काळात बरेच नागरिक नवीन नोकरीसाठी, विविध ऑनलाईन जॉब पोर्टल्सवर आपली माहिती अपलोड करत आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते, कि जर तुम्हाला नोकरीच्या संदर्भात काही ई-मेल अथवा sms आला तर हुरळून जाऊ नका. सावधपणे सदर ई-मेल, sms ची आधी सत्यता पडताळून बघा. सध्या भारतातील अनेक लोकांचा डेटा जो विविध जॉब पोर्टल्सवर uploaded होता, तो सध्या डार्कनेट व इंटरनेटवरील अन्य काळ्याबाजारात सहजपणे उपलब्ध आहे. या डेटाचा गैरफायदा घेऊन, नोकरीबाबत प्रयत्नशील असणाऱ्या होतकरू उमेदवारांना फसविण्यासाठी सायबर भामट्यांनी अनेक फेक लिंक बनविल्या आहेत. त्यामुळे  ज्या कंपनीच्या नावाने तुम्हाला नोकरीची ऑफर आली आहे त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून सदर ऑफरची खात्री करून घ्या. जर त्या कंपनीचा काही कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल तर तिथे कॉल करून संबंधित डिपार्टमेंट कडून खातरजमा करून घ्या. जर कोणत्याही ई-मेल अथवा sms मध्ये लिंक दिली असेल व त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला काही रक्कम भरून मग interview च्या संदर्भात सखोल माहिती दिली जाईल अशा आशयाचा काही मजकूर असेल तर, कृपया अशा लिंकवर क्लीक करू नका व क्लिक केल्यास त्यावर कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करू नका. जर तुम्हाला पैसे भरा असे विनंती करणारा फोन आला तर तुम्ही त्याला बळी पडू नका व तुम्हाला नोकरीची ऑफर देणाऱ्या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर व्यक्तिगत भेटीसाठी आग्रही राहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *