बौद्धधर्मीय अनुयायांनी नागपूर येथे जाऊ नये – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोरोना विषाणू साथीच्या संसर्गामुळे यावर्षी धम्म परिवर्तन दिनाच्या नागपूर येथील कार्यक्रमास परवानगी नाही

बीड, दि. २४ ::– धम्म परिवर्तन दिनानिमित्त यावर्षी नागपूर येथील कार्यक्रमास परवानगी नाही, उद्या विजयादशमी या दिवशी बौद्ध धर्माचे अनेक अनुयायी धम्म परिवर्तन दिनानिमित्त दरवर्षी दीक्षाभूमीवर नागपुर येथे येतात. तसेच सुमारे 8 ते 10 लाख अनुयायी जमतात. परंतु यावर्षी कोरोना साथीच्या रोगामुळे या सभा व कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली नाही. याबाबत नागपूर जिल्हा प्रशासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांना कळविले असून कृपया बौद्धधर्मीय अनुयायांनी नागपूर येथे जाऊ नये, अशी विनंती केली आहे.

परंतु तरीही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील काही अनुयायी रेल्वेे किंवा बस किंवा स्वतःच्या वाहनाने प्रवास करून येण्याची शक्यता आहे. येथे कोणताही कार्यक्रम आणि सभा यांना परवानगी नसल्याच्या सूचना सर्व रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर करण्यात येत आहेत. जेणेकरून नागपुरकडे जाण्यासाठी प्रवास केल्यास लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागेल, या पार्श्वभूमीवर बौद्धधर्मीय अनुयायांनी उद्या नागपूर येथे धम्म परिवर्तन दिन कार्यक्रमासाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.