अखिल महाराष्ट्राचे ‘बाबा’

परिवर्तनवादी नेते, कष्टकरी बांधवांचे आधारस्तंभ, सामाजिक कार्यकर्ते माननीय बाबा आढाव साहेब आज, १ जून रोजी रोजी वयाची ९० वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याबद्दल आणि सामाजिक वाटचालीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेल्या भावना…..

आदरणीय बाबा आढाव साहेबांचा वाढदिवस हा महाराष्ट्राच्या पुरोगामी, प्रगतशील विचारांच्या चळवळीचा वाढदिवस आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांवरील निष्ठेचा हा वाढदिवस आहे. ‘एक गाव एक पाणवठा’आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक समतेची चळवळ गावागावात घेऊन गेलेल्या संघर्षव्रतीचा हा वाढदिवस आहे. समाजातील वंचित, उपेक्षित, दुर्बल, कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी जीवनभर लढत आलेल्या योद्ध्याचा हा वाढदिवस आहे. राजकारणात, समाजकारणात काम करत असताना व्यापक लोकहितासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे सांगणाऱ्या दीपस्तंभाचा हा वाढदिवस आहे. आदरणीय बाबांच्या परिवर्तनवादी चळवळीचा एक हितचिंतक या नात्यानं त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं, अशी त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रार्थना करतो. समाजातील कष्टकरी बांधवांच्या लढ्याला आदरणीय बाबांचं नेतृत्वं दीर्घ काळ मिळत रहावं, अशा सदिच्छा व्यक्त करतो.

आदरणीय बाबांचं कार्य आणि कार्यकर्ते महाराष्ट्रभर असले तरी बाबांचं पुण्याशी एक वेगळं नातं आहे. याच नात्यातून माझा बाबांशी अनेकदा भेट, संपर्क, संवाद होतो. त्या प्रत्येक भेटीत बाबांकडून सोनचाफ्याचं फूल आवर्जून मिळतं. त्यांच्याकडून मिळणारं सोनचाफ्याचं फूल हे त्यांच्यातल्या चांगुलपणाची, ममत्वाची, आपुलकीची प्रचिती देऊन जातं. त्या सोनचाफ्याचा दरवळ आणि बाबांचं स्थान माझ्या मनात कायमच राहणार आहे.

बाबांचं संपूर्ण जीवन हे उच्च कोटीच्या नैतिक मूल्यांनी भरलेलं आहे. खरतर बाबा हे आयुर्वेदाचे डॉक्टर. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात ते वाढले. सुरुवातीच्या काळातंच समाजवादी विचारांशी जुळलेली नाळ वयाच्या नव्वदीतही तितकीच घट्ट आहे, यातून त्यांची वैचारिक बांधिलकी व सामाजिक निष्ठा अधोरेखीत होते.

कष्टकरी बांधवांच्या, वंचित समाजघटकांना हक्क मिळवून देण्यासाठी बाबांनी अनेक आंदोलनं केली. अर्धशतकाहून अधिक वेळा तुरुंगवास भोगला. त्यातून अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली. बाबांच्या आंदोलनांइतकंच त्यांचं सामाजिक कार्यही मोठं आहे. हमाल पंचायतीच्या माध्यमातून बाबांनी उभं केलेलं काम हे त्यांच्या संघटन कौशल्याचं, कष्टकरी बांधवांबद्दलच्या तळमळीचं प्रतिक आहे. आज दररोज पंधरा हजारांहून अधिक श्रमिकांना ‘कष्टाची भाकर’मिळते, ती केवळ आदरणीय बाबांमुळेच, असं मला वाटतं. असंघटीत कामगारांना संरक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे, याचंही खूप मोठं श्रेय हे आदरणीय बाबांनी केलेल्या पाठपुराव्याला आहे, हे मान्य करावं लागेल.

पुण्यासह अनेक शहरांच्या झोपडपट्टीत राहणारे गरीब नागरिक, हमाल बांधव, कष्टकरी बांधव, घरकाम करणारा भगिनीवर्ग, रिक्षाचालक बंधू अशा अनेकांसाठी बाबांनी आपलं आयुष्य वाहिलं आहे. आज बाबा खऱ्या अर्थाने या कष्टकऱ्यांचे ‘बाबा’आहेत. ते केवळ पुणेकरांचे नाहीत तर अखिल महाराष्ट्राचे ‘बाबा’बनले आहेत.

सामाजिक सुधारणांचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुण्यातील निवासस्थान फुलेवाड्याचं  राज्य संरक्षित स्मारक व्हावं यासाठी आदरणीय बाबांनी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आदरणीय शरद पवार साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हा प्रश्न सुटला. बाबांच्या आंदोलनाची आणि सामाजिक कार्याची यादी खूप मोठी आहे. ‘एक गाव एक पाणवठा’, हमाल माथाडी कायदा, पथारी व्यावसायिकांसाठीचे धोरण, रिक्षा पंचायतीद्वारे रिक्षाचालकांच्या प्रश्नांची झालेली सोडवणूक असे अनेक प्रश्न केवळ बाबांच्या आंदोलनांमुळे मार्गी लागले, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं.

आदरणीय बाबांनी अल्पकाळ राजकारण आणि आयुष्यभर समाजकारण केलं. १९६२ ते १९७१ या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून काम केलं. नागरी आघाडीतर्फे त्यांनी नाना पेठेचे प्रतिनिधीत्व केलं होतं. दोन्ही वेळेस ते याच वार्डातून निवडून गेले. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी साहेब, नानासाहेब गोरे साहेब, भाई वैद्य साहेब, काँग्रेसचे नेते शिवाजीराव ढेरे साहेब, नामदेवराव काची साहेब, नामदेवराव मते साहेब अशा अनेक मान्यवर आणि मातब्बर नेत्यांच्या सोबत त्यांनी काम केलं आहे. निश्चितच या सर्वांचा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला आणि त्यांच्या कामातून समाजाच्या उपयोगी आला.

सामाजिक, कामगार चळवळीत काम केल्यानंतर कार्यकर्त्यांना राजकारणात येण्याचे वेध लागतात. परंतु बाबांचा प्रवास उलटा झाला. समाजातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी, असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबांनी राजकारण सोडून पूर्णवेळ चळवळीला वाहून घेतलं. ठरवून असा उलटा प्रवास करणारं आदरणीय बाबांसारखं एखादंच व्यक्तिमत्वं असू शकतं. महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी, सत्यशोधक चळवळीच्या विचारांनी भारावलेले, राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारांच्या संस्कारात वाढलेले आदरणीय बाबा आढाव म्हणजे महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक आहेत. आपल्या सर्वांच्या मनात त्यांचं स्थान निश्चितंच वरचं आहे.

मी आदरणीय बाबा आढाव साहेबांना नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो.

अजित पवार,

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published.