ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिष्टचिंतन

नव्वदी पूर्ण केल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि.१ :-  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बाबांनी आपल्या चळवळीतून ‘एक गाव-एक पाणवठा’, ‘अंगमेहनती कामगार’, ‘कष्टाची भाकर’ या संकल्पना महाराष्ट्रात रुजविल्या. हमाल पंचायतीच्या माध्यमातून हमाल-मापड्यांना कामगार म्हणून ओळख दिली. भटके-विमुक्त, काचपत्रा कामगार, वीटभट्टी कामगार संघटना, देवदासी अशा अनेक वंचित घटकांना त्यांनी संघटीत केले. त्यांचे विषमता आणि जाती निर्मुलनाचे काम कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असे आहे. विषमता निर्मुलनाच्या शिबिरातून महाराष्ट्रातील अन्य पुरोगामी चळवळींचा उगम झाला. महात्मा जोतिराव फुलें यांच्या विचारांचे कृतीशील कार्यकर्ते असणाऱ्या बाबांनी महाराष्ट्रातल्या अनेक चळवळींचे नेतृत्त्व केले आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वंचित घटकांपर्यंत पोहचून, त्यांच्या न्याय मागण्यांना बाबांनी आवाज दिला आहे. त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आहे.


महाराष्ट्राच्या समाज मनाच्या जडणघडणीत बाबा आढाव यांचे योगदान अमुल्य आहे. ते आमच्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थानी आहेत. बाबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तसेच त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *