ही वेळ अजिबात निष्काळजी होण्याची नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आपल्यासाठी… 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

कोरोना विरुद्धच्या लढाईत जनता कर्फ्यूपासून ते आजपर्यंत आपण सर्व देशबांधवांनी एक दीर्घ प्रवास पार पाडला आहे. काळानुसार, आर्थिक व्यवहारांमध्ये देखील हळूहळू गती येतांना दिसते आहे. आपल्यापैकी बहुतांश जण, आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, पुन्हा एकदा आयुष्याला गती देण्यासाठी रोज घरातून बाहेर पडतो आहोत. सणवारांच्या या काळात, बाजारातही, हळूहळू चैतन्य, गर्दी दिसू लागली आहे. मात्र, आपल्याला हे विसरायचं नाही, की लॉकडाऊन भलेही संपला असेल, कोरोना विषाणू मात्र गेलेला नाही. गेल्या सात आठ महिन्यांत, प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नांमुळे, भारत आज कोरोनाच्या बाबतीत ज्या सुस्थिर परिस्थितीत आहे, ती परिस्थिती आपल्याला बिघडू द्यायची नाही, उलट, त्यात आणखी सुधारणा करायची आहे. आज देशात, रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे, मृत्यूदर कमी आहे. भारतात जिथे प्रती दहा लाख लोकसंख्येमधील सुमारे साडेपाच हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तिथे अमेरिका आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये हा आकडा, 25 हजारांच्या जवळपास आहे. भारतात, प्रति दहा लाख लोकांमध्ये मृत्यूची संख्या 83 इतका आहे. मात्र, अमेरिका, ब्राझील, स्पेन, ब्रिटन यांसारख्या अनेक देशात, ही संख्या 600 पेक्षा अधिक आहे. जगातील समृद्ध साधन संपत्ती असलेल्या देशांच्या तुलनेत, भारत आपल्या जास्तीत जास्त नागरिकांचे आयुष्य वाचवण्यात यशस्वी होतो आहे. आज आपल्या देशात, कोरोनाच्या रूग्णांसाठी 90 लाखांपेक्षा अधिक खाटांची सुविधा उपलब्ध आहे. 12 हजार विलगीकरण केंद्र आहेत. कोरोनाच्या चाचण्या देखील सुमारे 2000 प्रयोगशाळांमध्ये केल्या जात आहेत. देशात  चाचण्यांची संख्या लवकरच दहा कोटींचा आकडा पार करणार आहे.

कोविड या जागतिक साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत चाचण्यांची वाढती संख्या, आपली एक मोठी ताकद आहे. “सेवा परमो धर्म..” या मंत्रानुसार वाटचाल करत, आपले डॉक्टर्स, आपल्या परिचारिका , आरोग्य कर्मचारी, आपले सुरक्षा रक्षक, आणि इतरही अनेक लोक जे सेवाभावाने कार्य करत आहे, ते एवढ्या मोठ्या लोकसंख्येची नि:स्वार्थ सेवा करत आहेत.

या सर्व प्रयत्नांमध्ये, ही वेळ अजिबात निष्काळजी होण्याची नाही. ही वेळ असं समजण्याची अजिबात नाही, की कोरोना आता गेला आहे, किंवा आता कोरोनाचा धोका उरलेला नाही. अलीकडेच, आपण सर्वांनी असे अनेक फोटो, व्हिडीओ बघितले, ज्यात  स्पष्ट दिसतंय की अनेक लोकांनी, आता सावधगिरी घेणे एकतर बंद केले आहे, किंवा मग वागण्यात अत्यंत शिथिलता आली आहे.

हे अजिबात योग्य नाही. 

जर तुम्ही निष्काळजीपणा करत आहात, मास्क न लावता बाहेर पडत आहात, तर तुम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या कुटुंबातल्या मुलांना , ज्येष्ठांना तेवढ्याच मोठ्या संकटात टाकत आहात. आपण लक्षात ठेवा, आज अमेरिका असो, किंवा मग युरोपातील इतर देश, या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत होते, मात्र अचानक त्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे आणि ही वाढ चिंताजनक आहे.

मित्रांनो,

संत कबीरदास यांनी म्हटले आहे—

“पकी खेती देखिके, गरब किया किसान।

अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान।”

म्हणजेच, अनेकदा, तयार  झालेलं पीक बघूनच आपल्यामध्ये अति आत्मविश्वास निर्माण  होतो, आपल्याला वाटतं की आता तर काम संपले. मात्र जोपर्यंत पीक घरात येत नाही, तोपर्यंत काम पूर्ण झालं असं समजायला नको. म्हणजे जोवर पूर्ण यश मिळत नाही, तोपर्यंत निष्काळजीपणे  वागू नये.

मित्रानो, जोवर या महामारीवर लस  येत नाही, तोवर आपण कोरोनाविरुद्ध लढाईत  कणभरही कमी पडायचे नाही. अनेक वर्षांनंतर आपण असे होताना पाहत आहोत, कि मानवतेला वाचवण्यासाठी  युद्धपातळीवर संपूर्ण जगात  काम होत आहे. अनेक देश यासाठी काम करत आहेत, आपल्या देशातील वैज्ञानिकही लस बनवण्यासाठी जीवापाड मेहनत करत आहेत. देशात अजून कोरोनाच्या अनेक लसींवर काम सुरु आहे. यातील काही प्रगत टप्प्यावर आहेत.

आशादायी स्थिती दिसत  आहे. कोरोनाची लस जेव्हा येईल तेव्हा लवकरात  लवकर प्रत्येक भारतीयाला लस कशी पोहचेल यासाठी सरकारची तयारी सुरु आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी जलद गतीने काम सुरु आहे.

मित्रानो, रामचरित मानस मध्ये खूप शिकण्यासारखी गोष्ट आहेत मात्र त्याचबरोबर अनेक प्रकारचे इशारे आहेत. खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. रिपु रुज पावक पाप प्रभु अहि गनिअ न छोट करि। म्हणजे आग शत्रू, पाप म्हणजे चूक , आजार याना छोटे मानू नये. पूर्ण इलाज होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणून लक्षात ठेवा, जोवर औषध नाही, इलाज नाही तोपर्यंत आपण निष्काळजी व्ह्यायचे नाही.

सणाचा काळ आपल्या जीवनात आनंदाचा , उल्हास, उत्साहाचा काळ आहे. एक  कठीण काळ मागे सारून आपण पुढे जात आहोत. थोडीशी बेपर्वाई आपला वेग मंदावू शकते. आपला आनंद हरवू शकते. आयुष्यातल्या जबाबदाऱ्या पार पाडणे , आणि सतर्कता बाळगणे या दोन्ही गोष्टी  एकत्र असतील तर जीवनात आनंद राहील. सहा फुटांचे सुरक्षित अंतर, वारंवार हात साबणाने धुणे, मास्क लावणे  लक्षात ठेवा.  मला तुम्हाला सुरक्षित पाहायचे आहे. तुमच्या कुटुंबाला सुरक्षित पाहायचे आहे. हे सण तुमच्या आयुष्यात उत्साह, आनंद आणतील असे वातावरण तयार झालेले मला पाहायचे आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला आवाहन करत आहे.

आज मी आपल्या माध्यमांमधील मित्रांना, सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांना देखील आग्रहाने सांगू इच्छितो कि तुम्ही जनजागृतीसाठी, नियमांचे पालन करण्यासाठी जितकी जनजागृती मोहीम राबवाल,  तुमच्याकडून देशाची मोठी सेवा होईल. तुम्ही जरूर साथ द्या. देशाच्या कोट्यवधी जनतेला साथ द्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो , तंदुरुस्त राहा,  जलद गतीने पुढे जा.  आपण सर्व मिळून देशालाही पुढे घेऊन जाऊ. याच शुभेच्छांसह  नवरात्री, दसरा, ईद, दीपावली, छठपूजा, गुरुनानक जयंतीसह सर्व सणांच्या सर्व देशवासियांना पुन्हा  शुभेच्छा देतो.

धन्यवाद..!