तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपत्तीग्रस्तांना दिलासा

नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन प्रस्ताव पाठवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
Image

सोलापूर, दि. 19 : आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

मुख्यमंत्री  ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

Image

मुख्यमंत्री  ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.

आस्थेवाईकपणे चौकशी

रमेश बिराजदार हा शेतकरी तब्बल 24 तास झाडावर आणि पाण्यात होता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी त्यांना बाहेर काढले होते. मुख्यमंत्री  ठाकरे यांनी  बिराजदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. उपचार घेतले का, तुम्हाला आता काही त्रास होतोय का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. रडत रडतच त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

Image

आपत्तीग्रस्तांना धनादेशाचे वाटप

यावेळी आपत्तीग्रस्त रमेश बिराजदार, लक्ष्मण कोणदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री  ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले.ठाकरे यांनी बोरी नदीची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाची त्वरित डागडुजी करण्याचे निर्देश दिले.

तहसीलदार अंजली मरोड यांनी पूरग्रस्त आणि बाधित झालेल्या कुटुंबांची माहिती दिली. रामपूर गावातील 50 टक्के रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी बोरी नदीला पूर आल्याने 40 घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेकडो एकर शेतीचेही नुकसान झाले आहे. बोरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची सात जनावरे वाहून गेल्याने दगावली आहेत. तुरीच्या आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहितीही श्रीमती मरोड यांनी दिली.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड, जि.प. सदस्य आनंद तानवडे, सरपंच शोभा बिराजदार, उपसरपंच रोहिणी फुलारी, आदींसह परिसरातील आपत्तीग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन प्रस्ताव पाठवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

सोलापूर, दि. 19 : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले.

सोलापुरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठक घेतली. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे, जनावरांचे आणि जीवितहानीची मा‍हिती शक्य तितक्या लवकर संकलित करुन शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवावा. हे प्रस्ताव तयार करताना महसूल, कृषि, पशुसंवर्धन या सर्व विभागांनी एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Image

हवामान विभागाने येत्या आठवड्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आणि कृषि विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना द्याव्यात. पूर येण्याची शक्यता असणाऱ्या भागातील नागरिकांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्यात यावे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची काळजी घ्यावी. पावसात  मनुष्यहानी होणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री  ठाकरे यांनी दिल्या.

महसूल मंत्री थोरात म्हणाले, पावसामुळे पुणे विभागातील जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यात नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा घेऊन राज्य शासन मदतीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विचार करेल. त्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची नोंद देखील नुकसानीच्या अहवालामध्ये घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोलापूर तसेच पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पुणे विभागात सर्वाधिक जास्त नुकसान सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत सादरीकरण केले. जिल्ह्यात शेती, फळबागा, रस्ते, वीज वहन यंत्रणा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. येत्या तीन चार दिवसात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले.

या बैठकीस पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जलसंपदा विभागाचे जयंत शिंदे, धिरज साळे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्यांच्या वारसांना धनादेशाचे वाटप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्यांच्या वारसांना धनादेशाचे वाटप

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आषिशकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव,अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख उपस्थित होते.

यावेळी पंढरपूर येथे भिंत पडून मयत झालेले मंगेश गोपाळ अभंगराव यांच्या पत्नी अश्विनी मंगेश अभंगराव, गोपाळ अभंगराव यांच्या मुलगी लता कोळी, राधा गोपाळ अभंगराव यांच्या मुलगी रतन शिरसाट, संग्राम जगताप (रा. भंडीशेगाव) यांच्या आई शोभा जगताप, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील सखाराम गायकवाड यांच्या पत्नी धनाबाई गायकवाड, माढा तालुक्यातील शिवाजी यादव यांच्या पत्नी वर्षा यादव, उद्धव खरात यांच्या पत्नी सोजरबाई खरात, कलावती विठ्ठल करळे यांचा मुलगा लाला करळे, शंकर देवकर (सावळेश्वर, ता. मोहोळ) यांच्या पत्नी रेणुका देवकर आणि शंकर चवतमाळ (श्रीपत पिंपरी, ता. बार्शी) यांचे वडील बाळासाहेब चवतमाळ यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही