ओला दुष्काळ घोषित  करा- विरोधी पक्ष नेते फडणवीस यांची मागणी

मुंबई दि. 16 ऑक्टोबर- महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली या त्या भागातील शेतक-यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तेथे ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतक-यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी नुकताच अतिवृष्टी झालेल्या मराठवाडयातील बाधित जिल्ह्यांना भेट देऊन येथील परिस्थितीचे निवेदन सादर केल्याचेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
    विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी २ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर, २०२० या कालावधीत मराठवाडयातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला असुन नुकसानग्रस्त शेतीची पहाणी, शेतक-यांशी संवाद, त्यांच्या अडचणी, शेतक-यांना शासनाकडुन असलेल्या अपेक्षा याबाबत त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी प्रत्यक्ष चर्चा केली. मराठवाडयातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्या्तील प्रमुख बाबींचे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी केलेले सविस्तर निवेदनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आलेले आहे. यादृष्टीने सदर निवेदनातील मागण्यांबाबत शासनस्तरावर त्वरित सकारात्मक निर्णय घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.