पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधे ‘माय लाईफ माय योगा’ व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धा केली जाहीर
नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘माय लाईफ माय योगा’ (जीवन योगा) या व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेत प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन ‘मन की बात’ या देशवासियांशी संवाद साधणाऱ्या मासिक कार्यक्रमामध्ये केले आहे. आयुष मंत्रालय आणि आयसीसीआर, भारतीय सांस्कृतिक संबंध विषयक परिषद यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे. योग केल्याने व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव आणि येत्या 21 जूनला येणाऱ्या सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाशी संबंधित कार्यक्रम म्हणून स्पर्धेत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.आयुष मंत्रालयाच्या सोशल मिडिया हॅन्डल वर आज, 31 मे 2020 ला ही स्पर्धा लाईव झाली आहे.

या आधीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनी हजारो लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सामुहिक प्रात्यक्षिके केली. मात्र कोविड-19 चे संसर्गजन्य स्वरूप लक्षात घेता यावर्षी मोठ्या प्रमाणात एकत्र येणे उचित नाही. म्हणूनच मंत्रालय लोकांना त्यांच्या घरीच, संपूर्ण कुटुंबाच्या सहभागासह योग प्रात्यक्षिके करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. माय लाईफ माय योगा या व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेद्वारे आयुष मंत्रालय आणि आयसीसीआर योग विषयी जागृती आणि आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 मधे जनतेने सक्रीय सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देत आहे. फेसबुक,ट्वीटर आणि इस्टांग्राम या सोशल मिडिया मंचाद्वारे या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ही व्हिडीओ स्पर्धा सर्व देशातल्या लोकांसाठी खुली आहे.
दोन टप्य्यात ही स्पर्धा होईल. पहिल्या टप्य्यात आंतरराष्ट्रीय व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेत त्या त्या देशातले विजेते निवडले जातील.त्यानंतर विविध देशातल्या विजेत्यामधून जागतिक पारितोषिक विजेते निवडले जातील.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यासाठी तीन श्रेणी ठेवण्यात आल्या असून त्या अंतर्गत प्रवेशिका पाठवता येतील. युवा (18 वर्षाखालील), प्रौढ (18 वर्षावरील) आणि योग व्यावसायिक तसेच महिला आणि पुरुष सहभागींसाठी स्वतंत्र. यामुळे एकूण सहा श्रेणी होणार आहेत. भारतातल्या स्पर्धकांसाठी, पहिल्या टप्य्यात प्रत्येक श्रेणीसाठी, 1 लाख, 50 हजार आणि 25 हजार अनुक्रमे प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी जाहीर करण्यात आले आहे. जागतिक पारितोषिकांचे तपशील आयुष मंत्रालयाच्या पोर्टलवर लवकरच जाहीर करण्यात येतील.
ही स्पर्धा जगभरातल्या सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेच्या प्रवेशासाठी स्पर्धकाने योग विषयक तीन आसने (क्रिया, आसने, प्राणायाम, बंध किंवा मुद्रा) यांचा 3 मिनिटाचा व्हिडीओ आणि त्याबरोबर या योग साधनेमुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम झाला याचा संदेश किंवा माहिती देणारा छोटा व्हिडीओही अपलोड करायचा आहे.
फेसबुक,ट्वीटर आणि इस्टांग्रामवर स्पर्धेच्या हॅशटॅग#MyLifeMyYogaINDIA सह आणि योग्य श्रेणी हॅशटॅगसह व्हिडीओ अपलोड करता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना आयुष मंत्रालयाच्या योग पोर्टलवर (https://yoga.ayush.gov.in/yoga/) पाहता येतील.
पंतप्रधानांनी स्पर्धेच्या केलेल्या घोषणेमुळे या संदर्भात अपार उत्सुकता निर्माण झाली आहे. आयुष मंत्रालयाला विश्वास आहे की या औत्स्यूक्याचे सार्वजनिक आरोग्य लाभात रुपांतर होईल कारण कोविड-19 महामारी परिस्थितीच्या विविध पैलूंच्या व्यवस्थापनात योग सकारात्मक परिणाम घडवत आहे हे आता स्वीकारले गेले आहे.