मराठवाड्यात कापुस, सोयाबीन, मुग, उडीद, हळद पीकांचे मोठे नुकसान

औरंगाबाद : परतीच्या पावसाने मराठवाड्याच्या विविध भागात मोठे नुकसान केले आहे. पण रब्बीची पेरणीही लांबणीवर पडली आहे.मराठवाड‌यात गेल्या शुक्रवारपासून औरंगाबादसह काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले नगदी पीक हिरावून नेले. काढणी करून शेतातच ठेवलेली खरीप पिके पाण्यात गेली आहेत.

मोसमातील तसेच परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात कापुस, सोयाबीन, मुग, उडीद, हळद पीकांचे मोठे नुकसान झाले असून अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागातील १० ते १२ लाख हेक्टरवरील पीकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

परंडा (जि.उस्मानाबाद) : मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे उल्फा नदी व ओढ्या, फुटलेल्या पाझर तलावाच्या पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या परंडा तालुक्यातील वडणेर शिवारातील नरसाळे वस्तीवरील एकूण 95 जणांना नदीचे पाणी ओसरताच सुखरुप बाहेर काढल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु होता. बुधवारी (ता. १४) पडलेल्या विक्रमी मुसळधार पावसाने सर्वत्र मोठा हाहाकार उडाला आहे.तालुक्यातील वडणेर-देवगाव येथील उल्फा नदीला पूर आल्याने व वडणेर परिसरातील पाझर तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या परिसरातील नरसाळे व सलगरवस्तीवरील एकुण ९५ लोक पाण्याच्या वेढ्यात अडकुन पडलेले होते. माहिती मिळताच रात्रीच उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, नायब तहसिलदार गणेश सुपे, अजित वाबळे, मिलिंद गायकवाड, तलाठी ननवरे यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन अडकलेल्या ग्रामस्थांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी वरिष्ठस्तरावरुन उपाययोजना सुरु केली होती.

गुरुवारी सकाळपासून तहसीलदार हेळकर अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेसह तळ ठोकुन होते. दुपारी १२ च्या सुमारास दुधडी भरुन वाहणाऱ्या उल्फा नदीचा पाण्याचा विसर्ग कमी होऊन पूरजन्य परिस्थिती कमी झाली. पाणी कमी होताच नरसाळे वस्तीहुन आवारपिंपरी ते वडणेर रस्त्यावरुन अडकलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढले. यामध्ये लहान मुले, एक महिन्याची बाळंतीण महिला, वयोवृद्धांचाही समावेश होता. वस्तीवरील जनावरेही सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनास यश मिळाले.

लोहारा तालुक्यातील ४५ प्रकल्पापैकी उमरगा तालुक्यातील ३१ आणि लोहारा तालुक्यातील सर्वच अकरा प्रकल्प तुडुंब भरले आहेत.

शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी-भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे

उस्मानाबाद : उस्मानाबादसह इतर अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनाम्याची गरज नसून शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी, अशी मागणी माजी कृषीमंत्री तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.शहरातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात गुरुवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. नदीकाठच्या गावात पाणी घुसले आहे. शेती-शिवारात पाणीचपाणी झाले आहे. उभी पिके वाहून गेली आहेत. सोयाबीनच्या गंजीही पुरात वाहून गेल्या आहेत. सध्या पंचनाम्याचे सत्र सुरू झाले आहे.  वास्तविक पंचनाम्याची गरज नाही. सरसगट सर्वांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट मदत करावी, अशी मागणी बोंडे यांनी यावेळी बोलून दाखविली आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले आहेत. मात्र राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष करून मोठी चूक करीत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेण्याच्या ऐवजी केवळ विरोधाला विरोध म्हणून या कायद्यांना विरोध करीत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी सरकारला माफ करणार नाही, असेही बोंडे यावेळी म्हणाले.मागच्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसाने उमरगा – लोहारा  तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अठरा तलाव शंभर टक्के भरले होते. परतीच्या पावसाचा कहर शेतीच्या नुकसानीला कारणीभूत ठरला मात्र पाणी साठ्यात मोठी वाढ झाली, त्यामुळे येणाऱ्या काळात ओलिताखालील क्षेत्र वाढू शकते शिवाय पाणीटंचाईचा प्रश्नही मिटणार आहे.