वडगाव साठवण तलावासाठी हस्तांतरणासह भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी- मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे निर्देश

मुंबई, दि. १४ : उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी हस्तांतरणासह भूसंपादन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री श्री.शंकरराव गडाख यांनी दिले.

मंत्रालय येथे वडगाव साठवण तलावासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्यासह जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंधारण मंत्री श्री. गडाख म्हणाले, वडगाव प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र सहाशे एकरपेक्षा कमी असल्याने हा साठवण तलाव मृद व जलसंधारण विभागात हस्तांतर करण्यासाठी प्रकल्पाचे विभागीय स्तरावर प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता अंदाजपत्रक, नकाशे पुस्तिका, बुडीत क्षेत्रातील मूल्यांकने, परिनिरीक्षण टिप्पणी, पत्रव्यवहार धारिका व भूसंपादन पत्रव्यवहार इत्यादी अभिलेखे हस्तांतरित करण्यात आले आहेत. प्रकल्प कृष्णा खोरे महामंडळाच्या प्रकल्प संख्येतून वगळण्यात आला असून जलसंपदा विभागामार्फत निधीची तरतूद करण्यात आलेली नाही असेही त्यांनी सांगितले.

श्री. गडाख म्हणाले, या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाव परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा तलाव लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया अधिक गतीने करण्यात यावी. तसेच जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभागाने प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि कामाला सुरुवात करण्याचे निर्देश श्री.गडाख यांनी दिले.