पदवीधर मतदाराला मतदान करते वेळेस मास्क असणे आवश्यक -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 12   : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास लेखी आक्षेप नोंदवावेत. त्याचबरोबर इतरही काही सूचना असल्यास थेट कळवाव्यात. तसेच कोविड 19 च्या अनुषंगाने खबरदारीचे उपाय देखील योजन्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रत्येक मतदाराला मास्क वापरणे बंधनकारक असेल, त्यासाठी राजकीय पक्षाने मतदारांत जागृती निर्माण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. 

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ मतदान केंद्र प्रारूप यादी आणि कोविड 19 च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेतील बदल याबाबत त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजि बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर पुरूष, महिला आणि दिव्यांग व ज्येष्ठ मतदारासाठी रांगा असतील. एका  मतदान केंद्रावर जास्तीत जास्त एक हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. शिवाय मतदार मास्क लावून रांगेत वर्तुळ केलेल्या ठिकाणी उभे राहील. शारीरिक अंतर राखण्यात येईल.  ज्येष्ठ नागरिक 80 वर्ष व त्यावरील मतदार आणि कोविड 19 बाधित रुग्ण, दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकांची सुविधा उपलब्ध असेल. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान करण्याबाबत सर्वांनी मतदारांत जागृती निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पदवीधर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करा- डॉ. अनंत गव्हाणे
This image has an empty alt attribute; its file name is 121474930_173275157755373_6898759837504183284_o.jpg

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडा. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करा, असे अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 डॉ. गव्हाणे यांनी मतदान पूर्व, मतदानाच्या दिवशी, मतदानानंतर करावयाची कामे, क्षेत्रीय अधिकारी  यांचे अहवाल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान केंद्रे, मतदार जागृती, मार्ग  निश्चिती बाबत, कायदा व सुव्यवस्था, साहित्य स्वीकृती व तपासणी आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा मतदारांना उपलब्ध करुन देण्यात येत असल्याबाबत खात्री करावी. मतदान केंद्र, मतदान केंद्रांची व्याप्ती आदींबाबत माहिती करुन घ्यावी. कोविड-19 च्या अनुषंगाने मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी. स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदारांत जागृती निर्माण करणे. मतदान केंद्रांबाबत मतदारांना माहिती देणे. झोनमधील मतदान केद्रांना भेटी देणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यसाठी पोलिस, सुक्ष्म निरीक्षक यांच्याशी समन्वय ठेवावा. साहित्य स्वीकृती व तपासणी, मतदानाच्या आदल्या दिवशी करावयाची कामे, मतदान प्रक्रिये दरम्यान कर्तव्ये, क्षेत्रीय दंडाधिकारी म्हणून कर्तव्य बजावणे, मतदान संपल्यानंतरची कर्तव्ये पार पाडणे, अहवाल निश्चित वेळेत सादर करण्याबाबत श्री. गव्हाणे यांनी सविस्तर मार्गदर्शन अधिकाऱ्यांना केले . त्याचबरोबर त्यांच्या शंकांचे निरसनही केले. आभार नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर  यांनी मानले.