टंचाई काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नका – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,दि.09 : जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात पाणी साठा झालेला आहे. सर्व पाणी साठे, प्रकल्प सरासरी 98% भरलेली आहेत. टंचाई काळात पाण्याची कमतरता उद्भवू नये. यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील पाटबंधारे जलाशयातील पिण्याच्या पाण्याची गरजेची निश्चितीबाबत आयोजित बैठकीत श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिकुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंह, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एम. निंभोरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक आर. पी. काळे आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, सध्या झालेल्या पावसामुळे उत्तम व मुबलक पाणीसाठा जलाशयात आहे. या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास टंचाई काळात पाण्याची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ते यंत्रणांनी करावे. त्याचबरोबर खुलताबाद नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी प्राधिकरणाने पाठपुरावा करुन योजना पूर्णत्वास न्यावी. त्याचबरोबर औरंगाबाद शहराला आवश्यक असणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करुन शहरास योग्य, मुबलक, शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करुन द्यावे. शहर व जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होईल, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्रकल्पात सरासरी 98% जिवंत पाणीसाठा आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे सांगितले. मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी शहरासाठी तर ग्रामीण भागात श्री. गोंदावले यांनी आवश्यक व सद्यस्थितीत होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत सविस्तर माहिती पालकमंत्री श्री. देसाई यांना दिली. तर जीवन प्राधिकरणाचे श्री. सिंह यांनी प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत विकास प्राधिकरणाकडून उपलब्ध पाणी साठ्याबाबत श्री. काळे यांनी माहिती दिली.जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सुरुवातीला पालकमंत्री श्री. देसाई यांना सविस्तर माहिती देऊन बैठकीचे प्रास्ताविक केले.