पाणीपुरवठा व इतर कामांसाठीचा निधी जालना नगरपरिषदेकडे वर्ग करणार

मुंबई, दि.8 : पाणीपुरवठा व इतर कामांसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेला निधी जालना नगरपरिषदेला वर्ग करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

मंत्रालयात झालेल्या जालना नगरपरिषदेच्या हद्दीतील स्थानिक प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव याच्यासह नगरविकास विभागाचे आणि जालना नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग 211 अंतर्गत बाधित होणाऱ्या जालना अंबड पाणी पुरवठा योजनेतील जुनी पाईप लाईन स्थलांतराच्या पोटी प्राप्त 12.35 कोटी निधी जिल्हाधिकारी यांनी जालना नगरपरिषदेच्या थकीत वीज बील व पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरावा.

जालना शहरातील मध्यवर्ती भागात महात्मा फुले मार्केट या जागेवर मार्केटची भव्य अत्याधुनिक इमारत बांधण्यासाठी विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याविषयांसह जालना शहराच्या विविध विकासकामांविषयी चर्चा झाली आणि ती विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नगरविकास राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी सांगितले.