…अन् मुख्यमंत्री गेले माजी सैनिकांच्या भेटीला

मुंबई,७ जानेवारी / प्रतिनिधी :-मुंबईत संपूर्ण स्वच्छता अभियानात सहभागी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नरिमन पॉईंट येथील एनसीपीए संकुलात माजी सैनिकांचा मेळावा सुरू असल्याचे समजताच, तिकडे जात मुख्यमंत्र्यांनी माजी सैनिकांशी संवाद साधला.

देशाचे रक्षण करताना दिव्यांगत्व आलेल्या माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला. तुमचा कार्यक्रम सुरू असल्याचे समजल्यावर मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि तुमच्या भेटीला आलो, तुम्ही सारे सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करता म्हणून आम्ही सुरक्षित जीवन जगू शकतो याबाबत मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आम्हाला तुम्हा सर्वांचा सार्थ अभिमान असून राज्यात माजी सैनिकांसाठी काही योजना राबविण्याचा आमचा मानस आहे. तसेच याबाबत अजून काही करता येणे शक्य असेल तर आवर्जून सूचना कराव्यात असेही सुचवले. यावेळी तिन्ही सैन्य दलातील माजी सैनिक उपस्थित होते.