जुलै 2021 पर्यंत 20-25 कोटी लोकांना कोविड-19 लस देण्याचे सरकारचे लक्ष्य

डॉ हर्ष वर्धन यांनी संडे संवाद-4 मध्ये समाज माध्यम वापरकर्त्यांशी संवाद
COVID-19 लसीचे 400-500 दशलक्ष डोस प्राप्त करण्याची आणि त्यांचा उपयोग करण्याची सरकारची योजना

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज ‘संडे संवाद’च्या माध्यमातून समाज माध्यमांवरील विविध प्रश्नांना उत्तरे दिली. बऱ्याच प्रश्नकर्त्यांनी आजच्या भागात कोविड लस या संकल्पनेवर भर दिला. मंत्र्यांनी अतिशय संयमपणे कोविडसंदर्भात प्लाझ्मा थेरपीचा वापर, 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन, कोविड परिस्थिती लक्षात घेता देशातील शाळा सुरु करण्याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

लस वितरणाला प्राधान्य देण्याच्या प्रश्नांवर, डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालय सध्या एक प्रारूप तयार करीत आहे ज्यामध्ये राज्यांकडून लस प्राप्त करण्यासाठी प्राधान्य लोकसंख्या गटांची यादी, विशेषत: कोविड-19 च्या व्यवस्थापनात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्यात येईल.

आघाडीवरील कर्मचारी यात शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स, निम-वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, निगराणी अधिकारी आणि इतर अनेक व्यावसायिक श्रेणीतील कर्मचारी जे मागोवा, चाचणी आणि रुग्णांच्या उपचाराच्या कामाशी संबधित होते. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि राज्यांना शीत साखळी सुविधा आणि गट पातळीवरील इतर संबंधित पायाभूत सुविधांविषयी मार्गदर्शन करण्यात येईल.

केंद्र सरकार मनुष्यबळ, प्रशिक्षण, निरीक्षण यामध्ये क्षमतावृद्धी करण्याचे नियोजन करत आहे आणि जुलै 2021 पर्यंत 400-500 दशलक्ष डोस 20-25 कोटी लोकांना देण्यात येतील, असे प्राथमिक नियोजन आहे. हे नियोजन निश्चित करताना कोविड-19 रोगासंबंधीच्या प्रतिकारशक्ती आकड्यांवरही (इम्युनिटी डेटा) सरकार लक्ष ठेवून आहे.  असे डॉ.हर्षर्वधन यांनी सांगितले.

https://www.facebook.com/watch/?v=3281142565296376

ते पुढे म्हणाले की, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती सर्व प्रक्रियेचे नियोजन करत आहे. लस खरेदी ही केंद्रीकृत पद्धतीने होणार आहे आणि ज्यांना सर्वात जास्त आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहचेपर्यंत माग (रिअल टाईम ट्रॅकींग) घेतला जाईल.  

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, या समित्या देशातील विविध लसींच्या उपलब्धतेची वेळ समजून घेण्यासाठी, लस उत्पादकांकडून भारतासाठी किमान उपलब्ध डोस आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनाची हमी तसेच उच्च-जोखीम गटांना प्राधान्य यावर काम करत आहेत. हे काम सुरु असून लस तयार होईपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि लसीकरण कार्यक्रमाची जलद अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात येईल.

डॉ हर्षवर्धन म्हणाले की लसीकरणानंतर प्रतिकूल घटना जशा इंजेक्शन दिल्यानंतर वेदना होणे, हलका ताप आणि लालसरपणा, धडधडणे, अशक्तपणा यासारख्या प्रतिक्रिया असतात आणि या घटना क्षणिक असतात, त्याचा लस संरक्षणात्मक प्रतिसादावर काही परिणाम होत नाही. 

https://twitter.com/drharshvardhan/status/1312659867224612864

अशाच एका प्रश्नावर, त्यांनी ‘मानवी आव्हान प्रयोगा’संबंधीची नैतिक चिंता व्यक्त केली. जागतिक अनुभवानुसार या पद्धतीचा स्थापित फायदा होतो की नाही हे सिद्ध होईपर्यंत भारत अशा प्रकारच्या चाचण्या करण्याचा प्रयत्न करणार नाही. क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केलेली लस सुरक्षित आणि नोव्हेल कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी भारताकडे ठोस प्रक्रिया आहे. चाचण्या केल्यावर, मानवी आव्हान अभ्यास मुबलक दूरदृष्टी आणि सावधगिरी बाळगून करणे आवश्यक आहे. मिळवलेल्या माहितीचे मूल्य मानवी विषयांच्या जोखमीचे स्पष्टपणे समर्थन करणारे पाहिजे, असे ते म्हणाले.    

भारताने सलग 13 व्या दिवशी 10 लाखांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण संख्येचा कल कायम राखला 

आज सक्रिय रुग्णांची  संख्या 9,37,625 आहे. कालच्या तुलनेत ही संख्या 7371 ने  कमी आहे.सलग तीन दिवस सुट्या असूनही भारताने गुरुवार -शुक्रवार-शनिवारी अनुक्रमे 10,97,947, 11,32,675 आणि 11,42,131 इतक्या मोठ्या संख्येने दररोज चाचण्या केल्या. भारताच्या दैनंदिन चाचणी क्षमतेत लक्षणीय  वाढ झाली आहे. दररोज 15 लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जाऊ शकतात.

गेल्या दहा दिवसांत दररोज सरासरी 11.5 लाख चाचण्या करण्यात आल्या.जानेवारी 2020 मध्ये एकमेव  चाचणी  झाली होती, आता   एकूण चाचण्याची संख्या  7.89  कोटींच्या पुढे गेली आहे. सकारात्मकतेच्या  दरामध्ये मोठी  घट झाली आहे. सातत्याने  सकारात्मकतेचा  दर घसरत असल्यामुळे कोविड -19  संसर्गाचा प्रसार मर्यादित ठेवण्यासाठी चाचणी हे  अत्यंत प्रभावी साधन ठरत आहे. 

चाचण्यांच्या मोठ्या संख्येमुळे  लवकर निदान, त्वरित अलगीकरण आणि प्रभावी उपचार होत आहेत. यामुळे मृत्यूचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून  देशात गेल्या  24 तासांत  82,260 इतके रुग्ण बरे झाले आहेत.  याउलट 75,829 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  अलिकडच्या दिवसांत  बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा अधिक दिसून येत आहे.

भारताची बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 55 लाखाच्या (55,09,966) पुढे गेली आहे. एका दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याचे पडसाद राष्ट्रीय दरातही दिसून येत आहेत जो सध्या 84.13% आहे. कोरोनातून बरे झालेल्यापैकी 75.44%  दहा राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातले आहेतसर्वाधिक सक्रिय रुग्ण असल्यामुळे बरे झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत.देशातील सक्रिय रुग्णांपैकी 77.11% रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. आजपर्यंत, देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होऊन केवळ 14.32%  झाले आहे.नवीन रुग्णांपैकी  78% रुग्ण  दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशात केंद्रित आहेत. महाराष्ट्रात 14,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटक आणि केरळ या दोन्ही राज्यात अनुक्रमे 9886 आणि 7834 नवे रुग्ण आढळले आहेत. 

गेल्या 24 तासात 1000 पेक्षा कमी मृत्यू (940) नोंदले गेले आहेत.यापैकी 80.53% मृत्यू 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात झाले आहेत.काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी 29.57% मृत्यू  म्हणजेच 278 मृत्यू  महाराष्ट्रात झाले असून  कर्नाटकमध्ये 100 मृत्यूंची नोंद झाली.  मृतांच्या एकूण संख्येत महाराष्ट्राचे योगदान कमी होत आहे.