अतिवृष्टीने बाधित झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश

मंठा व परतूर तालुक्यात शेतपीकांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पहाणी

जालना, दि. 4 – मंठा व परतूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपिकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी शेतीला प्रत्यक्ष भेट देत झालेल्या नुकसानीची पहाणी केली. नुकसानीचे सरसकट पंचनामे करत नुकसानग्रस्त एकाही शेतीमधील पीक पंचनाम्यापासून सुटणार नाही याची सर्व संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार राजेश राठोड, ए.जे. बोराडे, पंकज बोराडे, कपील आकात, कल्याणराव सपाटे, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, मंठ्याच्या तहसिलदार श्रीमती सुमन मोरे, परतुरच्या तहसिलदार रुपा चित्रक, जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी भीमराव रणदिवे, हातवनचे सरपंच प्रभाकर अच्युतराव गिराम आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी मंठा तालुक्यातील हातवन तसेच परतुर तालुक्यातील चांगतपुरी व सावरगाव याठिकाणी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीची प्रत्यक्ष पहाणी केली.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, हातवन व परिसरात झालेल्या अतिवृष्टीने तसेच लोअरदुधना बॅकवॉटरचे पाणी शेतीमध्ये साठल्याने शेतकऱ्यांच्या ऊस, सोयाबीन, कापुस, मुग या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतपीकांचे सरसकट पंचनामे करण्यात येऊन त्याचा अहवाल तातडीने सादर करण्यात यावा. तसेच लोअरदुधना प्रकल्पामध्ये संपादित केलेल्या जमीनीपेक्षा अधिकच्या जमीनीमध्ये बॅकवॉटरचे पाणी साचल्यामुळे या जमीनीच्या भु-संपादनाचा प्रस्ताव तातडीने तयार करुन तो पाठविण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

अन् पालकमंत्र्यांनी बैलगाडीमधुन जाऊन केली पहाणी

मंठा तालुक्यातील हातवन येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपीकांची पहाणी करण्यासाठी जाताना रस्ता अत्यंत खराब झाल्याने त्या ठिकाणी कुठलेही वाहन जात नसल्याचे लक्षात येताच पालकमंत्री राजेश टोपे यांनी चक्क बैलगाडीमध्ये बसुन जात शेतपीकाच्या झालेल्या नुकसानीची पहाणी केली.

परतुर तालुक्यातील चांगतपुरी व सावरगाव येथील पिकांची पहाणी करुन उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधताना गावकऱ्यांनी रस्त्याची मागणी केली असता एमआरईजीस, पालकमंत्री पाणंद रस्ते यासह इतर योजनांच्या माध्यमातुन या भागात रस्त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करुन तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावर्षी सर्वदूर चांगल्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने सर्व धरणे भरली आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळणार असल्याने याचा उपयोग शेतीसाठी करुन अधिक चांगल्या प्रमाणात पीक घेण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु नागरिकांनीसुद्धा कोरोनाला आपल्यापासुन चारहात दुर ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन करत शासन व प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.