विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवा- जी. श्रीकांत

महापालिका हद्दीत ४७ ठिकाणी प्रचार रथ नेण्याचे नियोजन

छत्रपती संभाजीनगर ,२८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-‘विकसित भारत संकल्प यात्रा’, प्रत्येक वंचित लाभार्थ्यांपर्यंत जाणार आहे. यानिमित्ताने लाभापासून वंचित लाभार्थ्यांपर्यंत संबंधित योजनेचा लाभ पोहोचवावा,असे आवाहन मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.

सिद्धार्थ उद्यानात महापालिका हद्दीतील ‘विकसित भारत संकल्प यात्रे’स प्रारंभ करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, अति. आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, क्षेत्र प्रसिद्धी कार्यालयाचे संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या प्रचार रथाचा प्रारंभ पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. फेरोज खान इब्राहीम खान, आशाबाई भानुदास कंदे, सगुणा गंजेधर वाघ, शेहनाज शेख जाविद, नसरीन सय्यद रफिक या लाभार्थ्यांच्या हस्ते  प्रचार रथाची फित कापण्यात आली.

अति. आयुक्त रणजित पाटील यांनी महानगरपालिका हद्दीत यात्रा ४७ ठिकाणी जाणार असून त्याचे नियोजन उपस्थितांना सांगितले. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी योजनानिहाय कर्मचारी नेमून जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगितले.

अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी, या यात्रेद्वारे अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात यावा. तसेच या यात्रेद्वारे मिळणारी माहितीही गरजूंपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.

मनपा आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, ‘दारिद्र्य मुक्ती’ हे या यात्रेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आरोग्यासाठी असणाऱ्या ‘आयुष्यमान भारत’ सारख्या योजनेचा लाभ लोकांनी घ्यावा. गरजू व वंचित लाभार्थ्यांना या योजनांमध्ये सामावून घ्यावे,असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीचे स्टॉल्स लावण्यात आले होते. तसेच ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.प्रास्ताविक क्षेत्र प्रचार कार्यालयाचे संतोष देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राकेश वाणी यांनी केले.