विचारवंत पुष्पा भावे यांचे निधन

मुंबई : गिरणी कामगार नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गिरणी कामगारांच्या नेत्या म्हणून त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्या  प्रभावी वक्त्या, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. वयाच्या ८१व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. 

विचारवंत आणि लेखिका प्रा. भावे यांचा विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी संपर्क होता. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी घेतली होती. मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले. तर रुईया कॉलेजमधून त्या सेवानिवृत्त झाल्या.

पुरोगामी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतिशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित आदी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

साहित्यात नाटक हा त्यांचा विशेष आवड होती.  ‘आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’ हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या वेगळ्याच पैलूचे दर्शन घडवतो. निडरपणा म्हणजे काय, याचे उदाहरण म्हणून पुष्पा भावे यांनी घालून दिले होते. मुंबईतला मराठी माणूस कमी होत असल्याची चर्चा आजही होते. परंतु त्याविरोधात २५ वर्षांपूर्वी पुष्पा भावे यांनी आवाज उठवला होता. मराठी माणसांना मुंबईबाहेर घालवण्यास मराठी माणसांचे कैवारी म्हणवून घेणारेच याला जबाबदार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. ३ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पुष्पाताई भावे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.

प्राध्यापक पुष्पाताई भावे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची, सुधारणावादी विचारांची, दुर्बल-वंचित-उपेक्षित घटकांच्या हक्काच्या लढ्याची, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीची मोठी हानी आहे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.