पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना अटक

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले होते. मात्र यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवले. त्यानंतर हाथरसला पायीच जाण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला. मात्र यमुना एक्स्प्रेस वेवर त्यांना प्रशासनाने पुन्हा रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी तेथेच धरणे दिले. शेवटी पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले.

उत्तर प्रदेशातील हाथरस Hathras Case  या खेड्यात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिचा अमानुष छळ करण्यात आला. मृत्यूशी सुरु असणरी त्या तरुणीची झुंज अखेर अपयशी ठरली आणि तिनं या जगाचा निरोप घेतला. हाथरसमधील या घटनेनं साऱ्या देशात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. सदर प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारही निशाण्यावर आलं आहे. दरम्यान, पीडितेच्या मृत्यूनंतर हाथरसमधील परिस्थितत तणावाची भर पडली असून, सदर भागात कलम १४४ लागू करण्यात आल्याचं कळत आहे. 

Image

Image

दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखले. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं आणि राहुल गांधी यांना अटक केली.

Image

तुम्ही मला का आणि कोणत्या कलमांतर्गत अटक करत आहात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी अटकेपूर्वी पोलिसांना केला होता. परंतु कलम १४४ लागू असल्याने आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, असे उत्तर पोलिसांनी त्यांना दिलं. या वेळी कार्यकर्त्यांनी जीपला गराडा घातला. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी एफ-वन गेस्टहाऊस येथे नेले.

Image

दुसरीकडे राहुल गांधी यांची मतांच्या लाचारीसाठी नौटंकी सुरू आहे. त्यांना या प्रकरणात आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, अशी टीका भाजपच्या वतीने केली जात आहे. सलग दोन दिवसांतील सामूहिक बलात्कार प्रकरणांनी यूपीसह संपूर्ण देश हादरला आहे. दोन्ही घटनांतील पीडितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हाथरस जिल्ह्याची सीमा आज पूर्णपणे सील करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.