खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल
नांदेड ,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाने राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील अस्वछतेवरुन आक्रमक पवित्र घेत चक्क डीनच्या हातात झाडू देत शौचालयाची स्वच्छता करायला लावली. मात्र हे प्रकरण खासदार हेमंत पाटील यांच्या अंगलट आले आहे. डीनला स्वच्छता करायला लावून अपमानस्पद वागवणूक दिल्याप्रकरणी हेमंत पाटील यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडे यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या डीनना स्वच्छतागृह साफ करायला लावलं. खासदार हेमंत पाटील आज सकाळी रुग्णालयात पाहाणी करण्यासाठी आले होते. पाहाणी करताना त्यांना रुग्णालयातील स्वच्छतागृहात प्रचंड अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे संतापलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचा डीन एस आर वाकोडे यांच्या हातात झाडू आणि पाणी देऊन रुग्णालयातील शौचालयं त्यांना साफ करायला लावली
रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छता आहे. सर्वच शौचालयमध्ये प्रचंड घान, दुर्गंधी होती. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेवरुन खा. हेमंत पाटील यांनी डीनना धारेवर धरलं. अधिष्ठातांना सोबत घेऊन हेमंत पाटील यांनी चक्क त्यांच्या हातात झाडू देऊन शौचालय साफ करायला लावले. शौचालयात पाणी टाकून अधिष्ठातांना साफसफाई करायला लावली. इथे घडलेल्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असून सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.
नांदेड शासकीय रुग्णालयात 260 स्वच्छता कर्मचारी आहेत. पण हे कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वत:च्या घरची धुणीभांडी करण्यासाठी ठेवली असतील, तर सामान्य माणसांनी करायचं काय, असा सवाल हेमंत पाटील यांनी विचारला आहे. रुग्णालयातील नळांना तीन महिने पाणी नाही. अत्यंत घाणेरडी शौचालयं आहे. कोणी त्या शौचालयात जाऊ शकत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. शासन तुम्हाला पैसे देते, यंत्रणा देतं, यानंतरही असा ढिसाळ कारभार सुरु असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलंय.