महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम समृद्ध व्हावा,गणरायांना साकडे; बाप्पांकडून सकारात्मक, नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई :- श्री गणेशाचं आगमन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादच ठरेल. बाप्पांच्या कृपाछत्रामुळे महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा, असे साकडे घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यंदाचा हा उत्सव आपण उत्साहात, जल्लोषात आणि उत्सवाचं पावित्र्य राखून साजरा करूया. बाप्पांच्या सेवेत कुठेही कमी राहणार अशी आपण मनोभावे सेवा करतो.त्याचप्रमाणे आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेऊया. आपल्या परिसराची काळजी घेऊन हा उत्सव साजरा करूया. बाप्पांकडून सकारात्मक आणि नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया. बंधुभाव, सलोखा आणि परस्परातील प्रेम-आदर भाव वाढीस लागेल, असे उपक्रम आयोजित करूया, असे आवाहनही केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आहे की, श्री गणेशाच्या आगमनातून एक मांगल्यपूर्ण आणि पवित्र वातावरण निर्माण होते. दरवर्षी बाप्पा येतात. पण त्यांचे हे आगमन दरवर्षी आगळे आणि वेगळे भासते. त्यातून आपल्या नव्या आशा-आकांक्षा आणि संकल्पांना ऊर्जा मिळते. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आगळा लोकोत्सव आहे. म्हणून त्याकडे जगाचंही लक्ष लागलेलं असते. यंदाही या उत्सवातूनही आपण जगाला महाराष्ट्राच्या या वेगळेपणाची ओळख करून देऊया, असे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे यांनी गणरायांकडून सर्वांच्या आशा- आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हाव्यात अशी मनोकामना व्यक्त करत उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा

विद्या आणि कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या आगमनानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. निर्बंधमुक्त उत्सव साजरा करत असताना समाजभान जपण्याचे व पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेला गणेशोत्सव आता केवळ राज्यातच नव्हे तर देश-विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपण सर्वजण लाडक्या विघ्नहर्त्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. आपली संस्कृती, परंपरा व सामाजिक ऐक्य जपण्याचे कार्य या उत्सवाने केले आहे.

गणेश मंडळांनी वर्षानुवर्षे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक मनोरंजन, आरोग्य शिबीर आदी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्यामुळे राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, निर्माल्य ठरलेल्या ठिकाणीच एकत्रित केले जाईल, याची काळजी गणेश मंडळ व भाविकांनी घ्यावी, असे आवाहनही यानिमित्ताने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.

श्रीगणेशोत्सवाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणरायांच्या आगमनासोबत घराघरात धनधान्याची समृध्दी येईल. समाजात आनंद, उत्साह, भक्ती, चैतन्याचं वातावरण निर्माण होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

श्री गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, श्री गणेश चतुर्थी सणाला, सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेची, समाजप्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची, गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा अधिक वृद्धिंगत करतानाच नागरिकांनी समाजातील सर्वांना सोबत ठेवून गणेशोत्सव साजरा करावा. श्री गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आणि आपण सर्व श्रीगणरायांचे भक्त आहोत. त्यामुळे, गणपती बाप्पांचा उत्सव त्याच पद्धतीने साजरा झाला पाहिजे. कुटुंबातील, नात्यातील, मित्रपरिवारातील, समाजातील सर्वांनी मतभेद, मनभेद विसरुन, एकत्र येऊन, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदात, भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा.

राज्यातील काही भागात अजूनही पुरेसा पाऊस पडला नाही. राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील हे संकट दूर व्हावे. शेतात धान्याच्या आणि घरात धनाच्या राशी याव्यात. यंदाचा गणेशोत्सव शेतकऱ्यांसह आपल्या सर्वांच्या जीवनात, सुख, समृद्धी, आनंद, उत्साह, चैतन्य घेऊन येवो. श्री गणरायांच्या कृपेनं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगणरायांच्या चरणी केली आहे.