‘होऊ द्या चर्चा’ मोहिम गाव पातळीपर्यंत राबवुन शासनाच्या घोषणाचा फोलपणा जनतेपर्यंत न्या -शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जालना, १६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासुन शासनाने विविध योजनाची प्रचंड जाहिरातबाजी केली, प्रत्यक्षात या सर्व योजना फसव्या व केवळ घोषणाबाजीच होत्या. मुद्रा लोन, उज्वला गैस, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट, जन धन, स्वानिधी, किसान सन्मान योजना, जलजीवन अशा अनेक योजना योजनांतील सत्य काय ते गावा-गावात जाऊन लोकांना सांगावे व या सर्व योजना फसव्या असल्याचे उदाहरणे  द्यावीत. येत्या १ ते १२ आक्टोबर दरम्यान प्रत्यक्ष जनतेत जाऊन या योजनांची पोल-खोल करावी, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले आहे.
जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले की, राज्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यामुळे प्रचंड अडचणीत आलेला शेतकरी या बाबत सरकारची असणारी उदासीन भुमिका यावरही चर्चा करावी. संपूर्ण महाराष्ट्र भर होऊ द्या चर्चा अभियान राबविण्यात येणार असुन जालना जिल्हयात ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आजशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जाप्रâाबाद व भोकरदन तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन पुढील महिन्यात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मदतीने होऊ द्या चर्चा हा उपक्रम राबविण्याच्या सुचना केल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, माजी जि.प.अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर जगताप, मनिष श्रीवास्तव, माजी सभापती रमेश धवलिया, तालुकाप्रमुख कुंडलिक
मुठ्ठे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद फदाट, भोकरदन तालुका प्रमुख नवनाथ दौंड, शहरप्रमुख महेश पुरोहित, जालना शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले, विधानसभा समन्वयक सुरेश तळेकर यांच्यासह उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.