जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन

औरंगाबाद, दि.28  :- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातील प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी सजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, वर्षाराणी भोसले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी आपल्या सर्वांना सवयीत बदल करुन नवीन जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याबाबत मार्गदर्शन करणारी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”मोहिम कोरोनाला हद्दपार करण्यास उपयुक्त ठरणारी आहे. तरी सर्वांनी मोहिमेत सक्रिय सहभागी होत ही लोकचळवळ बनवावी. कोरोनाची साखळी तोडणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी ही मोहिम महत्वाची असून लोकप्रतिनिधी, प्रशासन, सर्व यंत्रणा यांनी  शेवटच्या माणसापर्यंत पोहचायचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपले कुटुंब सुरक्षित केल्यास पर्यायाने आपला महाराष्ट्र सुरक्षित होणार आहे. हा आरोग्य संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण असून निरोगी आयुष्यासाठी जनतेला तयार करण्याचे काम ही मोहिम करणार आहे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले