जालना हिंसाचार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  आवाहन- ‘सर्वांनी शांतता राखावी’

मुंबई ,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील जालना येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. शिवसेना-यूबीटीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य आले आहे. एक व्हिडिओ संदेश जारी करून त्यांनी मराठा आंदोलकांना (मराठा आरक्षण आंदोलन) शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले की, जालन्यातील दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. आंदोलनाच्या नेत्यांशी बोललो, त्यांच्या मागणीबाबत बैठक झाली. त्यांच्या मागणीबाबत प्रशासनाकडून कार्यवाहीही सुरू होती, मात्र त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. मी हे आंदोलन मागे घेण्याचा मुद्दाही मांडला होता, पण अचानक आंदोलनाची परिस्थिती बिकट झाली. या घटनेची माहिती मिळताच मी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. घटनेत जखमी झालेल्या सर्वांवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असून सर्वांनी शांतता राखावी.

मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

आंदोलकांच्या भावनांशी शासन सहमत; कायदा-सुव्यवस्थेसाठी शासनाला सहकार्य करा

image.png

मुंबई:  “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्याच राज्याच्या संपत्तीचे नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

मी मराठा समाज बांधवांना, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन करतो की, राज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावे. राज्याच्या साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्या, बांधवांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तात्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य, प्रयत्न करुया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्या, हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून ह्या घटना थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मराठा आंदोलक नेत्यांना, कार्यकर्त्यांना केले आहे. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.