कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ ; कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

मुंबई,२० ऑगस्ट /प्रतिनिधी :-वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. केंद्रायने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याचा शक्यता आहे. आता कुठे कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता. अशात निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून यामुळे नाशिक आणि अहमदनगरचे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

केंद्राने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करुन ४० टक्के केलं आहे. ३१ डिसेंबर पर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.यामुळे कांद्याचे भाव खाली येण्यास मदत होणार आहे. तर याचा थेट तोटा शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या कांद्याचे दर हे ३० ते ४० रुपयांच्या घरात असून किंमती पाडण्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वी बफर स्टॉक बाजारात आणला होता.

काही दिवसांआधीच कांद्याचे दर वाढले असताना अचानाक निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याविरोधात शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. तर नाशिकच्या लासलगाव, पिंपळगांव, सटाणा बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत केंद्राच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.

टोमॅटोनंतर कांद्याचे दर वाढण्याची भीती, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

दराची शंभरी पार केलेले टोमॅटो आता कुठे कमी होत आहेत. टोमॅटोचे दर बाजारात कमी झाले आहेत. यातच कांद्याच्या दरांनीही सर्वसामन्यांना रडवू नये यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. टोमॅटोप्रमाणे कांद्याचे दर वाढू नयेत यासाठी सरकार आधीपासूनच पावले उचलत आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. म्हणजेच कांदा परदेशात विकायचा असेल तर विक्रेत्याला ४० टक्के शुल्क सरकारला द्यावे लागेल.सरकारने कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधीच मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असेल.

खरंतर, गेल्या आठवड्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये नवे पीक येईपर्यंत किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने विशिष्ट क्षेत्रांमध्ये आपल्या बफर स्टॉकमधून कांदा बाजारात उतरवण्याची घोषणा केली होती. सरकार कांदा वितरणासाठी विविध पर्याय शोधत आहे. यात ई लिलाव, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ग्राहक सहकारी समिती तसेच नगरपालिकांकडून चालवल्या जाणाऱ्या दुकानांच्या माध्यमातून सूट देण्यासाठी राज्य अधिकाऱ्यांशी करार या मार्गाचा वापर केला जात आहे.

कांद्याच्या किंमतीत वाढ सुरू

बाजारात कांद्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. सध्या बाजारात ३० ते ३५ रूपये किलो दराने कांदा उफलब्ध आहे. किंमती कमी करण्यासाठी सरकारने काही दिवसांआधीच बफर स्टॉक बाजारात आणला होता. खराब दर्जाच्या कांद्याचे मोठे प्रमाण, टोमॅटोसह इतर भाज्यांच्या वाढत्या किंमती, पूर तसेच मुसळधा पाऊस ही अनेक कारणे कांद्याच्या किंमती वाढण्यास कारणीभूत आहेत.