उपमुख्यमंत्र्यांच्या ‘मॉनिटरींग कक्षा’ची भूमिका मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रुम’साठी सहायक व पूरक

राज्याची विकासप्रक्रिया गतिमान करणे हेच ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’चे उद्दिष्ट

‘वॉर रुम’ आणि ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम निश्चित दिसतील

विकासकामातील अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नांकडे सर्वांनी वस्तुनिष्ठ, सकारात्मक दृष्टीकोनातून बघावे

मुंबई,१२ ऑगस्ट /प्रतिनिधी :-कोकण, नाशिक, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत विकासप्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तत्काळ दूर व्हावेत, विकासाची कामे विनाविलंब मार्गी लागावीत यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून कार्यरत असून हा कक्ष मुख्यमंत्री महोदयांच्या ‘वॉर रुम’ला सहायक, पूरक भूमिका बजावत आहे. ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’चा उद्देश राज्याच्या विकासकामातील अडथळे दूर करुन विकासप्रक्रिया गतिमान करणे, महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनवणे हा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मंत्रिमंडळ राज्याची विकासप्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखिल ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’चा माध्यमातून आपले योगदान देत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात घेतलेली ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’ची बैठक ही 24 वी बैठक होती. या बैठकीत कोकणातील पर्यटन केंद्रांना जोडणारा कोकण सागरी महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, सातारा-अलिबागची वैद्यकीय महाविद्यालये, पुणे मेट्रो, पुणे रिंग रोड, मुंबईतील जीएसटी भवन, पुणे येथील कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूरचे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, पंढरपूर शहर, विठ्ठल मंदिर परिसराचा विकास आदी विकासकामांच्या प्रगतीचा तसेच निधी उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. तसेच विकासकामातील अडथळे दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. दर पंधरवड्याला नियमितपणे कक्षाची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल. प्रक्रियेतील अडथळे दूर केले जातील. विकासप्रक्रिया गतिमान केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी ‘वॉर रुम’च्या माध्यमातून निश्चित केलेल्या ध्येयपूर्तीसाठी, ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष’ सहायकाची भूमिका यापुढेही पार पाडत राहील. राज्यातील विकासप्रकल्पांना केंद्राची मंजूरी, मदत, सहकार्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केला जाईल. मुख्य सचिवांसह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, ‘वॉर रुम’चे प्रमुख राधेशाम मोपलवार हे सर्वचजण कक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून ‘वॉर रुम’ तसेच ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून योगदान देत आहेत. या सर्व प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम निश्चितच दिसतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. विकासप्रक्रिया गतिमान करण्याच्या या प्रयत्नांकडे वस्तुनिष्ठ आणि सकारात्मकपणे पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.