बिहार निवडणूकांचे बिगुल वाजले, तीन टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल

Bihar elections: EC

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होईल. यापैकी पहिल्या टप्प्यांत ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात अनुक्रमे २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. यानंतर १० नोव्हेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होईल. 

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बिहारमधील मतदारांची संख्या ६.७ कोटीवरून ७.२ कोटीपर्यंत वाढली आहे. यामध्ये ३.७९ कोटी पुरुष आणि ३.३९ कोटी महिलांचा समावेश आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच कोरोनापासून सुरक्षेसाठी सहा लाख फेस शील्डचा वापर करण्यात येईल. कोरोना रुग्णांनाही या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. 

२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपासून तीन टप्प्यात बिहारच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. १० नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. बिहारचे एकूण ७.२९ कोटी मतदार यात सहभागी होण्याची शक्यता आहे. ३.८५ कोटी पुरुष आणि ३.०४ कोटी महिला मतदार या राज्यात आहेत. कोरोना महामारीमुळे निवडणूकांची रणधुमाळी आणि रंगत किती रंगेल याबद्दल शंका व्यक्त केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र, या संदर्भात ( कोव्हीड 19 ) नियमावली जाहीर केली आहे.
 
कोरोनामुळे ( कोव्हीड 19 ) गेल्या निवडणूकांसारखा प्रचार रंगणार नाही. शक्तीप्रदर्शन नसेल किंवा महारॅली नसेल. रोड शो किंवा गर्दी जमा करणारे नेत्यांचे भाषण नसणार आहे. निवडणूक केंद्रांवरही मोठ्या रांगा नसतील. एका मतदान केंद्रांवर दीड हजार ऐवजी हजार लोकांनाच बोलवण्यात येणार आहे. सोशल डिस्टंसिंगचेही कडेकोट पालन केले जाणार आहे.
कोरोना विषाणूसह जगत असताना बिहार निवडणूकांचे पडघम वाजले आहेत. दोन मतदारांमध्ये सहा फूटांचे अंतर असणार आहे. एका दिवसापूर्वी बूथ आणि मतदान केंद्राचे निर्जंतूकीकरण केले जाईल. मतदान केंद्रात प्रवेश करताना तसेच बाहेर जाताना तापमान तपासले जाईल, सॅनिटायझर, हॅण्डवॉश या गोष्टींची व्यवस्था केली जाईल. मतदाराच्या शरीराचे तापमान घेतले जाणार आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णही करणार मतदान
 
जर तापमान जास्त आढळले तर अशा व्यक्तीला एक टोकन किंवा प्रमाणपत्र दिले जाईल, ती व्यक्ती मतदानाच्या शेवटच्या तासालाच मतदान करू शकते. मतदान केंद्रात तीन रांगा असतील, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक रांग, महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असतील. मतदाराला सही करण्यासाठी ग्लव्ज दिले जातील. मतदार केंद्राच्या आवारातही सॅनिटायझर दिले जातील. क्वारंटाईन आणि कोरोना रुग्ण आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेवटच्या तासाला मतदान करू शकणार आहेत. मतदान करण्यासाठी क्वारंटाईन व्यक्ती आणि कोरोना रुग्णांना सेक्टर मॅजिस्ट्रेटशी संपर्क करायचा आहे. तसेच त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेट मतदान हा पर्यायही उपलब्ध होणार आहे.
 
 
निवडणूक प्रचार कसा असेल ?
 
 
उमेदवार सुरक्षारक्षकांसह केवळ पाच व्यक्तींना सोबत घेऊन प्रचाराला जाऊ शकणार आहे. रोड शो करताना केवळ पाच गाड्यांचा एक ताफा असेल तर दुसऱ्या पाच गाड्यांसाठी दुसरा ताफा असेल. सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या उमेदवारावर कारवाईही केली जाऊ शकते. रॅलीमध्ये सोशल डिस्टंसिंग पालन करण्यासाठी निशाणही आखली जातील.
 
 
निवडणूक अर्ज कसा करणार ?
 
 
निवडणूक अर्ज आता ऑनलाईन करावा लागणार आहे. त्याची प्रिंट निवडणूक आयोग अधिकाऱ्याला द्यावयाची आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीटही) ऑनलाईन भरता येणार आहे. नोटरी केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याला याची प्रत सादर करायची आहे. अनामत रक्कम भरण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईनचा पर्याय देण्यात येणार आहे. तसेच रोख रक्कम भरण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. नोंदणी करताना उमेदवारला शक्ती प्रदर्शन करता येणार नाही. दोन पेक्षा जास्त गाड्या नोंदणी अर्ज भरताना नेता येणार नाहीत. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या वेळेवर बोलवण्यात येणार आहे.
 
 
प्रत्येकाला मास्क सक्ती
 
मतदान प्रक्रीयेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणे बंधनकारक आहे. निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास त्याच्यासाठी अतिरिक्त अधिकारी नेमण्याचीही तरतूद केली आहे. प्रत्येक व्यक्तीचे तापमान पाहिले जाणार आहे.
 
 
मतमोजणी कशी होणार ?
 
निवडणूक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत होणाऱ्या मतमोजणी प्रक्रीयेत सात पेक्षा जास्त मतमोजणी टेबल नसतील. या भागाचे निर्जंतुकीकरण केले जाईल. वीवीपॅटचे सील हटवण्याचे काम आणि कंट्रोल युनीटवर निकाल दाखवण्याचे काम एका टेबलवर एकच अधिकारी करणार आहे. निवडणूक निकाल मोठ्या स्क्रीनवर दाखवला जाईल. मतमोजणी करताना आणि करण्यापूर्वी सभागृह निर्जंतूकीकरण केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *