प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची एक्झिट

चेन्नई : प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. गेल्या २४ तासांमध्ये त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. कोरोनाचे निदान झाल्यामुळे त्यांना ५ ऑगस्टला चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज दुपारी १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याबद्दल त्यांचा मुलगा एस.पी. चरण यांनी माहिती दिली.
 
 
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांना आधी श्वासोच्छ्वास करायला त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे वृत्त आले. ही बातमी कळताच प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

कमल हसनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. एस.पींच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले. याशिवाय सलमान खानचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. तरुण असलेला सलमान आणि एस. पींचा परिपक्व आवाज यांचा ताळमेळ कसा बसेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र, हा चित्रपट सुपरहिट झाला आणि एस. पी. बालासुब्रमण्यम यांची गाणीही तुफान लोकप्रिय झाली. यानंतर एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी सलमानसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांना प्रसिद्धी मिळाली. याच दरम्यान तामिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक बालचंदर एका हिंदी चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी एस. पी. बालासुब्रमण्यम यांची निवड केली. चित्रपट होता ‘एक दुजे के लिये.’ विशेष म्हणजे, हा चित्रपट कमल हसन, रति अग्निहोत्री, एस. पी. बालासुब्रमण्यम या तीनही कलाकारांचा पहिला हिंदी चित्रपट होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी चित्रपटाचे संगीत तयार केले होते. मात्र, दाक्षिणात्य आवाज या चित्रपटासाठी वापरावा यावर त्यांचे दुमत होते. परंतु, एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या आवाजाने ते इतके भारावून गेले की त्यांनी गायक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. प्रदर्शनानंतर चित्रपट आणि गाणी दोन्हींना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘एक दुजे के लिये’ या पहिल्याच हिंदी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. एखादे गाणे कठीण वाटल्यास ते आठ-दहा दिवसांचा वेळ मागून सराव करत. मात्र, घाईचे काम असल्यास ते सहजपणे नकार देत. मध्यंतरीच्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून ‘विश्राम’ घेतला होता. २०१३ मध्ये आलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी त्यांनी मुख्य गाणे गायले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *