अजित पवार आल्याने महाराष्ट्रात एनडीए मजबूत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : गेले काही दिवस देशातील विरोधी पक्ष भाजपविरोधात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्यातच एकी नसल्याचे वारंवार समोर येते. पाटणामध्ये विरोधकांची एक बैठक पार पडल्यानंतर आज बंगळुरूमध्ये दुसरी बैठक पार पडली. तर दुसरीकडे दिल्ली येथे एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले . दरम्यान, बैठकीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एनडीएमध्ये ३८ घटकपक्ष सहभागी आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा देशात एनडीएला बहुमत मिळेल. अजित पवार पक्षात आल्याने महाराष्ट्रात एनडीए मजबूत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
देशातील विरोधकांबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे विचारधारा असलेलं संघटन आहे तर दुसरीकडे विरोधक नेता ठरवू शकत नाही आहेत. २०२४मध्ये संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचं नाव आदराने घेतलं जातं. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढं एनडीए बळकट होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.