नांदेड जिल्ह्यात लवकरच “ई-ऑफिस” – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड दि. 21 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध शासकीय कार्यालयातील कामकाजावरही विपरीत परिणाम झाला आहे. ज्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्या विभागातील कार्यालयीन कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे “ई-ऑफिस” प्रणाली लवकरच सुरु करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात झूम ॲपद्वारे जिल्ह्यातील विविध कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक झाली. त्यात त्यांनी हे सुतोवाच केले.

शासकीय कामकाज करतांना त्या-त्या कामासंदर्भातील नसती (फाईल) अनेक संबंधित विभागांच्या मंजुरीसाठी जात असते. संबंधित विभाग प्रमुख जर रजेवर असेल तर अशास्थितीत विनाकारण शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊ शकतो. अशास्थितीत जर विविध कामांच्या नसती अर्थात फाईल डिजीटल स्वरुपात पाठविल्या गेल्या तर याचे जावक क्रमांकासह त्या-त्या प्रकरणांना तात्काळ मान्यता देता येणे शक्य होईल. याचा शासनस्तरावर व्यापक विचार करुन आता “ई-ऑफिस” ही प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तालुकापातळीवरील विभागांशी जोडल्या जाऊन तात्काळ कामांचा निपटारा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *