मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेच्या प्रवाहात आणणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

शासनामार्फत मुक्त विद्यापीठात काही अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात अंतिम परीक्षा घेण्यात याव्यात व त्याचे स्वरूप विद्यापीठांनी निश्चित करावयाचे असल्याने विद्यापीठांना शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याची भुमिका राज्य शासनाची असून त्या अनुषंगाने राज्यभरात विद्यापीठांना भेटी देवून त्यांच्या परीक्षा पद्धतीची रूपरेषा, पूर्वतयारी व परिक्षांच्या नियोजनात शासनाचा सहभाग यांची सांघड महत्त्वाची असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ९१ हजार म्हणजे सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणणार असून त्यासाठी विद्यापीठाला शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

आज यशवंतराव चव्हाण माहाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यश ईन सभागृहात परिक्षांबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश बोंडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. सामंत म्हणाले, यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी खासदार शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून आजच्या २५ वर्षांपूर्वी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर देशभर मुक्त शिक्षण प्रणालीचा विस्तार होत गेला. आज १६१ अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ९१४ विषयांचे  जवळ जवळ ६ लाख २७ हजार विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्यातील अंतिम वर्षांची परीक्षा देणारे १ लाख लाख ९१ हजार विद्यार्थी आहेत, त्यासाठी ऑनलाईन परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून १० लाख ४१ हजार परीक्षा घ्यावयास लागणार आहेत. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असून विद्यार्थी आहे तिथून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप, संगणक तसेच त्यांच्यकडे इंटरनेट कनेक्टिविटीसह उपलब्ध असलेल्या डिव्हाइस अथवा साधनाद्वारे ते देवू शकतील.त्यासाठी आवश्यक असलेली पूर्व प्रक्रिया विद्यापीठामार्फत सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यातील ४० हजार विद्यार्थी ऑफलाईन पर्याय निवडतील असा विद्यापीठाचा अंदाज आहे. परंतु डिजिटल व ऑनलाईन शिक्षणाचा राज्यातला पहिला प्रयोग विद्यापीठाने सर्वप्रथम राज्यात राबवला, यशस्वी केला आज तोच प्रयोग केरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच विद्यापीठांना अंगिकार करावा लागतोय ही शासनाद्वारे स्थापित विद्यापीठाची सर्वात मोठी उपलब्धी असून त्यामुळे विद्यापीठातील अंतिम वर्षांची परीक्षा देणारे १०० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या परीक्षापद्धतीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री श्री. सामंत यांनी केले.

आज दिवसेंदिवस कोरोना संसर्गितांची संख्या वाढत असून त्याला प्रामुख्याने विविध कारणास्तव होणारी गर्दी कारणीभूत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी नकरता घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे शासन-प्रशासनामार्फत स्वागतच आहे. अंतिम वर्षातील परीक्षार्थींच्या संख्येचा विचार करता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जवळ जवळ २ हजार विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून परीक्षा देणार आहेत. त्यासाठी विद्यापीठामार्फत राज्याच्या मुख्य सचिवांना तसेच पोलीस महासंचालक, त्या त्या जिल्ह्यातील आपत्ती नियंत्रण प्राधिकरण, जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधिक्षकांना पूर्वकल्पना द्यावी, जेणेकरून मनुष्यबळ, पोलीस सुरक्षा, त्याचबरोबर कुठलाही कायदा सुवियवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यावर उपाययोजना, नियंत्रण करणे शासन-प्रशासनास शक्य होईल. त्याचबरोबर सार्वजनिक आरेग्याच्या व परीक्षार्थींच्या आरोग्याचाही प्रामुख्याने विचार करावा, असेही आवाहन यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी केले.

कोरोना काळातील कुठलेही गुणपत्रक बाधित असणार नाही

कोरोना काळात घेतल्या जाणाऱ्या कुठलेही गुणपत्रक अथवा पदवी प्रमाणपत्र कोरोना कालखंडातील म्हणून बाधित केले जाणार नाही, अथवा त्यावर कुठलाही तशाप्रकारचा उल्लेख केला जाणार नसून नियमित परिक्षांच्या गुणपत्रक व प्रमाणपत्राप्रमाणे ते असतील, त्याबाबत राज्यस्तरावरून व्यापक जागृती व प्रसिद्धी मोहिम राबविण्यात यावी अशाही सूचना विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाला मंत्री. श्री. सामंत यांनी यावेळी केल्या आहेत.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा संपूर्ण ऑनलाईन होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुचवलेला पर्याय राबिण्याची शिफारस करणार

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नाशिक जिल्ह्यांच्या ती एक चिंतेची बाब झाली आहे. अशा परिस्थितीत सुमारे ४० हजार विद्यार्थी ६ ते ७ दिवस परिक्षेच्या निमित्ताने एकत्र येत असतील तर ते कोरोनाकाळात अत्यंत चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यासाठी ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परिक्षेच्या प्रवाहात कसे आणता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची सूचना याबैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली. त्यासाठी जिल्ह्यात असलेल्या ३० हजार आपले सरकार केंद्र/ ई सेवा केद्रांच्या सहाय्याने अथवा तहसील कार्यालयात उपलब्ध असलेल्या

पर्यायी ऑनलाईन पद्धतीने परीक्षार्थींना परीक्षा देण्यासाठी जिल्हा प्रशासन १०० टक्के सहकार्य करेल अशी ग्वाही वजा पर्याय श्री. मांढरे यांनी देताच मंत्री उदय सामंत यांनी या संकल्पनेचे कौतुक करतानाच ती तात्काळ उचलून धरली व ती राज्यात सर्वत्र लागू करण्याच्या दृष्टीने राज्याच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देताना त्यासाठी आपण शिफारस करणार असल्याचेही सांगितले.

राज्यशासनामार्फत मुक्त विद्यापीठात सुरू करणार कृषी विषयक अभ्यासक्रम

मुक्त विद्यापीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू होते. परंतु मधल्या कालखंडात युजीसी ने त्यांना तांत्रिक कारणास्तव सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली नाही. परंतु विद्यापीठाने यापूर्वी त्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या आवारात सुरू केलेले कृषी विज्ञान केंद्र व त्या माध्यमातून यशस्वी केलेले प्रयोग पाहता शासनाच्या माध्यमातून काही अभ्यासक्रम  सुरू करण्याचा आमचा विचार असून, जुन्या अभ्यासक्रमांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून त्याबात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असल्याचे सांगून विद्यापीठाने आपल्याकडील मुदत ठेवींच्या माध्यमातून विद्यार्थी कल्याण तसेच विद्यापीठाच्या विस्तारीकरणाचा विचार करावा व त्यासाठी शासनाशी समन्वय वाढवावा अशाही सूचना यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी दिल्या आहेत.

अशी असेल परीक्षा व कार्यक्रम

तीन पर्यायी प्रश्न असलेली प्रश्नपत्रिकेचा असेल. त्यासाठी ५० गुण असतील त्यापैकी ३० प्रश्न परीक्षार्थींना सोडवावे लागतील २० गुणांचे असेल प्रात्यक्षिक परीक्षा. २२ सप्टेंबरला वेळापत्रक जाहिर होणार असून २५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन परिक्षेसाठी नोंदणी केली केली जाणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परीक्षा व डिसेंबर महिन्यात निकाल तसेच परिक्षेपासून वंचित व नापास विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल अशी माहिती विद्यापीठाच्या वतीने यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *