जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग, गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संभाव्य पूरसदृश्य परिस्थितीतून सावरण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

औरंगाबाद ,नांदेड परभणी, जालना दि. 18 सप्टेंबर :- जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणामधून पाण्याची आवक सुरु असून जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. लघु व मध्यम प्रकल्प, तलाव हे शंभर टक्के भरले असल्यामुळे धरणातील मोठ्या प्रमाणातील पाण्याची आवक पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीकाठच्या परिसरातील लोकांनी सतर्क रहावे आणि नदीपात्रात जाऊ नये, वाहने व पशुधन नदीपात्रात सोडू नये तसेच कोणत्याही प्रकारची जिवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे.

नदीपात्रात कोणीही जाऊ नये

औरंगाबाद:जायकवाडी धरणातील पाणीसाठा 99.28% इतका झालेला आहे तथापी ऊर्ध्व भागातील धरणातून व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातुन  येणाऱ्या पाण्याची आवक दर तासी काही प्रमाणात वाढत आहे  तेव्हा उपरोक्त बाबीचा विचार करता धरणात येणाऱ्या पाण्याची आवक असाच पध्दतीने वाढत राहीली तर यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी प्रकल्पाच्या सांडव्यामधुन गोदावरी नदीपात्रात  100000 क्युसेक विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येउ शकते. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होईल       तेव्हा गोदावरी नदीकाठच्या गावाना या जाहीर आवाहनाव्दारे सूचीत करण्यात येते की नदीपात्रातील चल मालमत्ता,चीज वस्तु,वाहने, जनावरे, पाळीवप्राणी , शेती आवजारे व इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे व नदीपात्रात कोणीही जाऊ नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी

जायकवाडीमधून 94,000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग; 2006 नंतर प्रथमच अशी पूरस्थिती

पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाला.काल रात्री 10 वाजल्यापासुन प्रशासनाच्यावतीने नदी परिसरातील नागरिकांना धोक्याची सुचना देण्यात आलेली आहे. आगामी काळात पाण्याची आवक अधिक वाढल्यास नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येइल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 2006 नंतर पहिल्यांदा अशी पूरस्थिती उद्भवली आहे.
आज सकाळी 6 वाजताची प्रकल्पाची स्थिती:
१)  धरणाची पाणी पातळी:-१५२१.९० फुटामध्ये
२) धरणाची पाणीपातळी:- ४६३.८७५मीटर मध्ये
३) आवक (मागील २४ तासाची आवक):-३७६६२क्युसेक
४) एकूण पाणी साठा:- २८९७.१००दलघमी
५)जिवंत पाणी साठा:- २१५८.९९४दलघमी
६) धरणाची टक्केवारी: ९९.४४ %
७) उजवा कालवा विसर्ग :- ३००क्युसेक
८) पैठण जलविद्युत केंद्र :- ०.० क्युसेक
९)पैठण डावा कालवा :- ०.०० क्युसेक
१०) सांडवा विसर्ग :- ९४३२० क्युसेक

पुराच्या पाण्याने नागरिकांमध्ये घबराट 

जालना :अंबड व घनसावंगी  तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावला तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी भेट देऊन गाण्यांच्या बैठका घेतल्या नदीच्या काठावर असलेल्या घरांची तात्काळ सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्याची योजना तयार आहे सध्या तालुक्यात गोंदी या गावात नदीच्या काठावर असलेल्या मच्छीमारी व्यवसाय करणारे दिडशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास सुरूवात केली आहे अशी त्यांनी माहिती दिली. तालुक्याच्या आपेगाव,साष्टपिंपळगाव,बेळगाव आणि शहागड या गावात दोन ते तीन लाख क्युसेस पाणी पात्रात आले तर थोडी काळजी घ्यावी लागते असे ते म्हणाले. दरम्यान सध्या गोदावरीत मोठा पूर आला आहे परंतु पाणी नदीच्या पात्रात काठाच्या आत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तालुक्याच्या साडेगाव , जोगलादेवी,रामसगाव,बानेगांव,भोगावं,मंगरूळ,या गावात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. परतूर तालुक्यात गोळेगाव या गावाला पाण्याचा वेढा पडू शकतो सावरगाव,सावंगी,चांगतपूरी येथे नागरिकांना दक्ष करण्यात आले आहे. 

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात व्यापक बैठक

नांदेड दि. 18 :- मराठवाड्यातील जायकवाडी, माजलगाव या मोठ्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जायकवाडीच्या वर असलेले मुळा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातील पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात, जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात, माजलगाव धरणातील पाण्याचा विसर्ग सिंधफना नदीच्या पात्रात सोडल्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीकडे सरकत चालली आहे. सदर पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाली तर गोदाकाठच्या जिल्ह्यातील सुमारे 337 गावांवर याचा परिणाम होऊ शकतो. ही सर्व शक्य अशक्यता लक्षात घेता आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात जिल्हा प्रशासनातील संबंधित विभाग प्रमुखांची आणि लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक घेऊन विविध उपाय योजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.

Image may contain: one or more people, people sitting and indoor

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आदी संबंधित विभागाचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

जायकवाडी प्रकल्पातून 17 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून 1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, माजलगाव धरणातून 42 हजार 900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तसेच पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर पाणलोट क्षेत्रातून 5 हजार 824 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. हे सर्व पाणी गोदावरी नदीला येवून मिळत असल्यामुळे याचा सर्वाधिक संभाव्य धोका नांदेड शहराच्या सखल भागात व गोदावरी काठच्या गावात होऊ शकतो. याच बरोबर नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमाड धरणसुद्धा 100 टक्के भरले असून तेथून 1 लाख 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. पोचमाड प्रकल्प 100 टक्के भरल्यामुळे गोदावरी नदीत फुगवटा निर्माण झाल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. सद्यस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाच दरवाजातून 95 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टी झाली तर सध्या नांदेड शहरातील गोदावरी नदीचे पाणी धोक्याची पातळी गाठू शकते. सध्या जुन्या पुलावर 344 पाणी पातळी असून इशारा पातळी 351 मीटर आहे. धोका पातळी 354 मीटर इतकी असून सद्यस्थितीत पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपर्यंत असाच पाऊस चालू राहिला तर गाठू शकेल अशी भिती असल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याचे पाटबंधारे विभागाचे सचिव एन. व्ही. शिंदे यांनी संपर्क साधून संभाव्य पूर परिस्थितीची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड-19 चा संसर्ग लक्षात घेता याबाबत आरोग्याच्या वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात हे लक्षात घेऊन आरोग्य विभागालाही त्यांनी पूर्व तयारी करण्याबाबत सूचित केले. विशेषत: नांदेड शहरातील गोदावरी काठावर असलेल्या गोवर्धनघाट येथे पाणी पातळी वाढल्यास इतर ठिकाणी काय सुविधा उपलब्ध करता येतील याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागात शेतकऱ्यांच्या हातचे पीक धोक्यात आले असून याचा मोठा आर्थिक उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक भागात शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून त्याचे त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *