शासनाच्या योजना मूठभरांच्या घरी ; शिवसेना शिवगर्जना संपर्क मोहिमे दरम्यान समोर आले वास्तव

छत्रपती संभाजीनगर , ९ जून / प्रतिनिधी :- काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोट्यावधी रुपये खर्चून शासन आपल्या दारी या  कार्यक्रमाचे कन्नड येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हजारो लाभार्थ्यांना शासकीय योजनाचा लाभ देण्यात आल्या असल्याचा दावा करण्यात आलेला होता.परंतु ही माहिती अवास्तव असल्याचे चित्र समोर येत आहे.पिक विमा,पंतप्रधान किसान सन्मान योजना,अवकाळी पावसाचे थकलेले पैसे, रस्त्यांची झालेली दुरावस्था,अपूर्ण वर्ग खोल्याची समस्या असे अनेक प्रश्न कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी, औरळा, चापानेर व चिखलठाणा येथील ग्रामस्थांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या समोर मांडले.

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवगर्जना आता “जिंकेपर्यंत आता लढायचं” या संपर्क मोहिमेनिमित्त आज विरोधी पक्षनेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व आमदार उदयसिंह राजपूत यांनी कन्नड तालुक्याचा दौरा केला.यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटक प्रतिभाताई जगताप,तालुका प्रमुख संजय मोटे,उपजिल्हा संघटक हर्षलीताई मुठ्ठे व तालुका संघटक रूपालीताई मोहिते उपस्थित होते. 

यावेळी पिक विमा व अवकळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसान मिळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तांत्रिक समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते.बहुतांश शेतकऱ्याना नावे,आधार क्रमांक व सातबाऱ्यातील चुकीमुळे भरपाई पासून वंचित राहावे लागत असल्याच्या गावकऱ्यांनी तक्रारी केल्या.यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून नुकसान भरपाई लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना दानवे यांनी यावेळी तहसीलदार व स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. 

चापानेर येथील अपूर्ण शाळेच्या खोल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थानी निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देता दोन भागात शाळा सुरू करण्यात याव्या, अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

तसेच या गावातील गावकऱ्यांना वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असुन मागिल दोन वर्षांपासून येथे सूरु असलेल्या बसेस बंद करण्यात आलेल्या आहे.त्या सुरू करण्यात याव्या अशाही मागण्या यावेळेस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या. त्यांची माहिती घेऊन हा प्रश्न लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा यावेळी ते म्हणाले.

तसेच, शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त निवडणुकी पर्यंत मर्यादित राजकारण करू नये. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसंदर्भात नेहमी जागरुक राहुन गरीब,सामान्य व गरजू लोकांसाठी सतत कार्य करत असायला हवे. तसेच वरिष्ठ पातळीवर विकासाचे कामे असेल तर फक्त एकदा अर्ज देऊन थांबू नका? तर सतत त्याचा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावा, गरज पडली तर माझ्याशी संपर्क साधा असा सल्लाही त्यांनी पदाधिकऱ्यांना दिला.

याप्रसंगी आ.उदयसिंह राजपूत, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभाताई जगताप, तहसीलदार विद्याचरण कडावकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, ग्रामीण विकास अधिकारी चंद्रधार ढोकणी, तालुकाप्रमुख संजय मोटे,उपजिल्हा संघटक हर्षलीताई मुठ्ठे, तालुका विधान संघटक आण्णासाहेब शिंदे, महिला आघाडी तालुका संघटक रुपालीताई मोहिते,लुंगारेताई, बाबसाहेब मोहिते, विभाग प्रमुख शरद शिरसाट, उपविभाग प्रमुख किशोर पवार, फुलचंद कुंठे, शाखाप्रमुख भागिनाथ पवार, भागिनाथ,गटप्रमुख रामेश्वर पवार, विनय जाधव, पवन पवार व राजू पवार, योगेश जिवरग,नवनाथ वंजारे,  भरत मिसाळ,योगेश पवार,रमेश वारे व गोरख बोराडे,भारत आरधे,चांगदेव सावडे, कमलाकर चौधरी, शहर प्रमुख गणेश सोनवणे, गणेश गायकवाड, गटप्रमुख रईस भाई शेख,भागिनाथ रावते, संतोष गवळी, तुषार पवार, रवी बडूगे, सोमीनाथ बरबंडे, संतोष फाळके व पंढरीनाथ धनुरे उपस्थित होते.