कोल्हापूरात तणाव! परिस्थिती नियंत्रणात

कोल्हापूर :-कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, कोणीही कायदा हातात घेऊ नये. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या औलादी कोण आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. सरकार त्यांच्यावर नक्कीच कारवाई करेल, मात्र कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

आंदोलक घरी जात असताना शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी विशिष्ट घरे, दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. जमाव आक्रमक झाल्याने त्याला पांगवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सध्या कोल्हापूर शहरात एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत स्वतः रस्त्यावर उतरून जमावास आवरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

ज्या लोकांनी दगडफेक, हुल्लडबाजी केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही तपासाला सुरूवात केली आहे, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले आहे. नागरिकांनी भयमुक्त रहावे, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, असेही अधीक्षक म्हणाले.

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू कार्यकर्ते जमले आहेत. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मटण मार्केटमध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. शिवाजी चौकात जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरात मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. मात्र कोल्हापूर पोलिसांनी त्यास विरोध करत तुम्हाला हवे तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचे आवाहन केले असून रॅली होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. कोल्हापूर पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी चौक परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद आहेत.बिंदू चौकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह, सुमारे एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

आक्रमक जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या कांड्या

जमावाकडून अनेक दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड करण्यात आली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला तरी परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे जमाव सैरभैर झाल्याने परिस्थिती पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेली.

दरम्यान, कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौक परिसर वगळता इतर ठिकाणी शांतता आहे. इतर तालुक्यांमध्ये दुकाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, बंदी आदेश असतानाही कोल्हापुरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी कालच आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते आंदोलन करत आहेत. यावर आम्ही प्रतिक्रिया देत आहोत. विद्यार्थ्यांसह कोणालाही त्रास होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी संघटनांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. 

काय आहे नेमकं प्रकरण ?

काही तरुणांनी पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरच्या एकात्मतेला तडा गेला आहे. अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

‘कायदा मोडणाऱ्याला पाठिशी घालणार नाही’कोल्हापूरच्या जनतेला मुख्यमंत्र्यांचे शांतता पाळण्याचे आवाहन

कोल्हापूरमधील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले की, ‘राज्यात कायदा सुवव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सरकारचे आहे. सगळ्या नागरिकांनाही कायदा राखण्याचे आवाहन करतो. सगळ्यांनी सहकार्य करावे. मी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी गृह विभाग घेत आहे. स्वतः गृहमंत्रीदेखील या प्रकरणात जातीने लक्ष घालून आहेत,’ असेही ते म्हणाले.

जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद

कोल्हापुरातील तणावाचे पडसाद जोतिबा डोंगरावर उमटले. संपुर्ण जोतिबा मंदिर मार्गावरील व गावातील दुकाने बंद ठेऊन बंदला नागरिकांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मात्र, भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी दर्शनासाठी जोतिबा मंदिर खुले ठेवण्यात आले होते.

गृहविभागाचे कोल्हापूर पोलिसांना आदेश

औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही. असे सांगत, जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. तसेच, कोल्हापूर पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करा, अशी सूचनादेखील दिली आहे. कुणी चुकीचे वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणा, असे निर्देश गृहविभागाने दिले आहेत.

समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ६ जणांना अटक

या घटनेत दोषी असणाऱ्या काल दगडफेक करणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. कोल्हापुरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.