परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ६ जून / प्रतिनिधी :-  शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रात अनेक विकासकामे राबवत महाराष्ट्राला गतिमान करण्याचे धोरण हाती घेतले आहे. यातच आणखी एका अभिमानास्पद गोष्टीची भर पडली आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आला आहे. या आर्थिक वर्षात एक लाख १८ हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली. ही आकडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे गेले असं बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंप स्टोरेजच्या संदर्भात महाराष्ट्राने केंद्र सरकार व एका खासगी कंपनीशी दोन महत्त्वाचे करार केले आहेत. हे ऐतिहासिक करार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात आतापर्यंत कुठेच गुंतवणूक झालेली नाही, असा दावा त्यांनी केला. यातून १३५०० मेगा वीज निर्मिती होणार आहे. यात जवळपास ७१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून तीस हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार असल्याचं ते म्हणाले. या पंप स्टोरेजच्या माध्यमातून खालचे पाणी वर उचलले जाते, यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. तर रात्रीच्या वेळी वरचे पाणी खाली आणले जाते आणि त्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

एफडीआयमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरल्याने फडणवीसांचा विरोधकांना टोला

केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाने नुकतीच परकीय गुंतवणुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली. यात महाराष्ट्र पुन्हा अव्वल ठरला असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. २०२० ते २०२२ या काळात महाराष्ट्राचा क्रमांक घसरला होता. मात्र २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख १८ हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली. २०२१-२२ च्या तुलनेत हा आकडा ४ हजार कोटींनी अधिक आहे. २०२० मध्ये गुजरात तर २०२२ मध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर गेला होता. पण आता आमचे सरकार आले आहे आणि महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर गेला आहे. त्यामुळे आता जे लोक उद्योग इकडे गेले, उद्योग तिकडे गेले असे म्हणत होते, आता तरी त्यांची तोंड झाली पाहिजे. जे ते करू शकले नाहीत ते आम्ही या ठिकाणी करून दाखवले असा दावाही फडणवीस यांनी केला.