मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास पूर्ण करण्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन प्रयत्न करूया – पालकमंत्री शंकराव गडाख

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास पूर्ण करण्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन प्रयत्न करूया – पालकमंत्री शंकराव गडाख

उस्मानाबाद, दि.17 :- हैदराबाद  मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक  आयुष्यभर  क्रियाशील  राहिले आहेत. केवळ स्वातंत्र्य  मिळविणे  एवढेच ध्येय  समोर  न ठेवता समग्र  विकासाचा  ध्यास  त्यांनी धरला होता, तो ध्यास लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. व ती जबाबदारी आपण सर्वजण एकत्रित येऊन पूर्ण करू या, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

हैदराबाद  मुक्तीसंग्राम दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण  पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे,आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)सचिन गिरी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगांवे,जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,तहसिलदार गणेश माळी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदिसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, हैद्राबाद  संस्थान  निजामाच्या  जुलमी राजवटीतून  मुक्त करण्याच्या लढ्याचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या  जीवितकार्याची  पायाभरणी  आपल्या  जिल्ह्यातील  हिपरग्याच्या राष्ट्रीय  शाळेत झाली,याची आजच्या दिनानिमित आपल्याला आठवण  येणे स्वाभाविक आहे.स्वामीजींच्या नेतृत्वाखाली निजाम राजवटीच्या  गुलामगिरी विरुध्द लढा देण्यात आला.त्यात गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, गंगाप्रसाद अग्रवाल, देवीसिंहजी चव्हाण,  भाई उध्दवराव पाटील, दिगंबरराव देशमुख, कॅप्टन  जोशी असे अनेक स्वातंत्र्य सैनिक सहभागी  झाले होते, त्यांना महिला स्वातंत्र्य सैनिकांनीही या स्वातंत्र्य संग्रामात निडरपणे साथ दिली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील देवधानोरा,  नंदगाव , चिलवडी  या गावांनी इतिहास रचला. यात चिलवडीचे रामलिंग जाधव, देवधानोऱ्याचे महादेव बोंदर, लक्ष्मण बोंदर, उस्मानाबादचे भास्करराव नायगावकर, जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने अशा सर्व ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची  आम्हाला  सदैव जाणीव आहे व यापुढेही राहील असे सांगून पालकमंत्री गडाख यांनी सर्वांना अभिवादन केले.

जिल्हयात  कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत असून 15 सप्टेंबर 2020 अखेरपर्यंत 80 कोवीड हॉस्पीटल व कोवीड सेंटर मध्ये 8 हजार 994 रुग्ण दाखल झालेले असून या पैकी 6 हजार 641 रुग्ण उपचारानंतर बरे होवून घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 40 टक्केवरून आज रोजी 74 टक्के पर्यंत पोहोचले असून ते 80 टक्के पेक्षा पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे सांगून पालकमंत्री गडाख यांनी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांच्या मार्गदर्शनातून दिनांक 15 स्प्टेंबर 2020 पासून उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोरोनाच्या लढाईत “माझे कुटूंब माझी जबाबदारी” ही  मोहीम राबवली जात असल्याचे सांगितले. यानुसार ग्रामीण व शहरी भागात दुर्धर आजार असलेल्या (को-माँर्बिड) रुग्णांना दर 15 दिवसांनी प्रत्यक्ष भेट देवून थर्मामिटर व पल्स ऑक्सीमिटरच्या  सहाय्याने तपासणी करण्यात येत असून 38 हजार  508 व्यक्तींना सेवा पुरविण्यात आलेली आहे. तसेच त्यांची Antigen  तपासणी करण्यात येत असून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे, अशी माहिती गडाख यांनी दिली.

रुग्णांची नियमित व वेळेत तपासणी व निदान होण्यासाठी जिल्हयात एकूण 15 Rapid Antigen Test  सेंटर ची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी दररोज  10 ते 3 या वेळेत तपासणी करण्यात येते. आज अखेर 49805 नागरीकांच्या  RTPCR व  ॲटीजैन  चाचण्या करण्यात आलेल्या असून बाधित रुग्णांना तात्काळ वैद्यकिय सेवा मिळण्याच्या दृष्टीकोनातून शासन व प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे श्री गडाख यांनी सांगितले.

आपला जिल्हा शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हा  म्हणून ओळखला जातो. महसूल प्रशासनाच्या वतीने सर्व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूबांना महसूल विभागाअंतर्गत विविध योजना जसे, घरगुती गॅस जोडणी,  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना,  श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,  संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, वारसांच्या नांवे फेरफार व घराच्या नोंदी 8अ उता-यावर घेणे या सर्व योजनांचा लाभ तात्काळ दिला जातो. तरीही जी कुटूंबे या योजनांपासून वंचित राहिले असतील अशा कुटूंबांचे सर्वेक्षण करुन पुढील 3 महिन्यात विशेष मोहीम राबवून त्यांना  लाभ देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालकमंत्री गडाख यांनी दिली.

Image

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्हयातील  71 हजार 82  लाभार्थ्यी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या असून त्यापैकी 67 हजार 907 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून 66 हजार 348 शेतकऱ्यांना 486 कोटी 67 लाख रक्कमेचा लाभ देण्यात आलेला आहे. शासन हमीभाव योजनेअंतर्गत जिल्ह्यात  सन 2019-20 या वर्षात  14 खरेदी केंद्रे कार्यरत होते व या केंद्रा मार्फत 11हजार 371 शेतकऱ्यांचा 1 लाख 35 हजार क्विंटल हरभरा खरेदी केलेला आहे तुर खरेदी साठी एकुण 11 खरेदी  केंद्रे कार्यरत होती. सदर केंद्रामार्फत 2 हजार 849 शेतकऱ्यांची  20 हजार 818 क्विंटल तुर खरेदी झालेली आहे. कळंब तालुक्यातील हासेगाव येथे कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित करून या केंद्रामार्फत 759 शेतकऱ्यांचा 16 हजार 177 क्विंटल कापूस खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्यात आला आहे, असे श्री गडाख यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महोदय यांच्या “विकेल ते पिकेल” या संकल्पनेतून बाजारात मागणी असलेल्या बाबींचे उत्पादन करून, काढणी पश्चात सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून विक्री व्यवस्था मजबूत करावयाची आहे, त्यादृष्टीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते “ बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचा ( स्मार्ट प्रकल्पाचा ) शुभारंभ दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आलेला असून   या योजनेतून शेतकरी गट व शेतकरी समूहांना मूल्य साखळी विकसित करण्यासाठी सहाय्य  करण्यात येणार आहे.जिल्हयातील  शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी   व्हावे असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले. कळंब आणि मुरूम या दोन बाजार समितीमध्ये ई-नाम योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयाचा समावेश राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ऑनलाईन नेटवर्कमध्ये झाला असून शेतमालास वाढीव भाव मिळण्यास मदत होणार  असल्याचेही त्यांनी सूचित केले.

जिल्हयात 11 लाख 86 हजार शेतकऱ्यांनी 57 हजार 624 हेक्टरचा रु. 4 कोटीचा विमा हप्ता शेतकरी हिस्सा म्हणून भरलेला होता व विमा संरक्षीत रक्कम 2 हजार 73 कोटी इतकी असुन त्या मोबदल्यात  8  लाख 23 हजार शेतकऱ्यांना 579 कोटी नुकसान भरपाई मिळालेली आहे. आपला लढा हा कोवीड आजाराशी आहे, आजारी व्यक्तींशी नाही. त्यामुळे नागरिकांनी कोवीड रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांशी कोणत्याही प्रकारच्या भेदभावाची वर्तणुक करु नये. त्यांना सहकार्य करुन कोरोनावर मात करण्यासाठी त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. कोवीड साथ रोगांशी लढा देत असलेल्या डॉक्टर्स, नर्स, आरोग्य दूत, सफाई कामगार, अंत्यविधी करणारे, समुपदेशक, कोरोनावर मात करणारे आबाल-वृध्द या सर्व कोरोना  योद्धा यांचे अभिनंदन पालकमंत्री गडाख यांनी केले. कोरोना प्रतिबंधासाठी शासन व प्रशासनाने  दिलेल्या मार्गदर्शक सूचना जसे विनाकारण घराबाहेर न पडणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात साबणाने स्वच्छ व नियमित धुणे, भौतिक अंतराचे पालन करणे, याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करण्याचे आवाहन ही त्यांनी याप्रसंगी केले.

आजच्या या ऐतिहासिक दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया शासन, प्रशासन आणि सर्व नागरिक मिळून आपल्या जिल्हयाला आकांक्षित जिल्हयांच्या यादीतून लवकरात लवकर बाहेर काढू  आणि  या जिल्हयाला विकसित जिल्हा म्हणून ओळख मिळवून देवू या ! आपण सर्व जबाबदार नागरिक म्हणून कायदा व सुव्यवस्था व सामाजिक शिस्तीचे पाईक होवून जिल्हयाच्या विकासासाठी एकत्रित येऊन चांगले काम करु या व मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकाचा समग्र विकासाचा इतिहास पूर्ण करूया असे आव्हान पालकमंत्री गडाख यांनी करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त समारंभास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्यसैनिक, सहकारी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी – कर्मचारी, पत्रकार आणि सन्माननीय नागरिक बंधू- भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Image

प्रारंभी पालकमंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अन्य मान्यवरांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना दिली. उस्मानाबाद येथील अर्जुन पुरस्कार प्राप्त खो खो क्रीडापटू सारिका काळे यांचा सत्कार पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *