वैजापूर शहरासह ग्रामीण भागात चक्रीवादळासारख्या वाऱ्यांचा कहर ; व्यापारी – शेतकऱ्यांची उडाली धांदल

शेड पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली

वैजापूर ,​४​ जून/ प्रतिनिधी :- चक्रीवादळासारख्या जोरदार वाऱ्यांनी रविवारी दुपारी दीड वाजेला वैजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात चांगलाच कहर केला. काही ठिकाणी जोरदार वारे तर काही ठिकाणी वाऱ्यांसह पावसाची रिपरिप यामुळे सुमारे एक ते दिड तास निसर्गाचा प्रकोप सुरु होता. या वातावरणामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाची चांगलीच धांदल उडाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, पत्रे उडाली. शहरातील विद्युत पुरवठा वाऱ्यांमुळे खंडित झाला होता.‌ गंगथडी भागात गोदावरी नदी काठी असलेल्या अनेक गावात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडल्याचे वृत्त आहे.

खासगी बाजार समितीत वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाल्याची भिती व्यक्त होत आहे. तेथील व्यापारी शेडचे पत्रे उडाले तर विक्रीसाठी आणलेला कांदा पावसाने भिजु नये म्हणुन शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक शेतकऱ्यांनी कांदा झाकुन नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. वैजापूर शहरातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका बसला. अनेक ठिकाणी जाहिरातींचे होर्डींग्ज व बॅनर्स कोसळल्याचे दिसुन आले. शहरातील मध्यवर्ती भागात एक झाड कोसळले. महावितरणच्या विद्युत वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा सायंकाळपर्यंत खंडित झाला होता.