पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे ध्वजारोहण ; स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना श्रद्धांजली

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेली ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहिम लोकचळवळ व्हावी – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड,दि.17 :– कोरोनाविरूद्ध आक्रमकपणे लढण्याची गरज असून यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी अशा अनेक चळवळी लोकसहभागाने आपण यशस्वी केल्या आहेत. मोहिम तीन टप्प्यात २४ ऑक्टोबर पर्यंत राबवली जाईल. लोक प्रतिनिधी, सरपंच, नगरसेवक व सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेऊन ही लोकचळवळ करण्याची वेळ आली आहे, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे ही लढाई आता एकांगी राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीयसमारंभ पोलीस मुख्यालय मैदान बीड येथे संपन्न झाला. यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन याप्रसंगी ते बोलत होते. समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी निमंत्रित उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुंडे यांनी उपस्थितांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कोरोनाच्या आपत्तीमध्ये आपण सगळे जिद्दीने शासनाच्या प्रयत्नांना साथ देत आहात सहा महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध आपण लढतो आहोत, आता कोरोनाची जगभर दुसरी लाट आली आहे असे दिसून येत आहे. यामुळै अनेक देशांनी कायदे कडकरीत्या राबवण्यास सुरुवात केली आहे. यामुळै ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेसाठी शासनाचे विविध विभाग काम करणार असून सर्व नगरपालिका, ग्रामपंचायत, गावे, वाडी, पाडे येथील घरोघर जावून प्रत्येक नागरिकाची आरोग्याची चौकशी आणि तपासणी करण्यात येईल. मोहीमेत चांगले काम करणाऱ्यांचा जिल्हास्तरावर पुरस्कार देऊन गौरव केला जाईल.

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, आताही आपण आरोग्याचे काही नियम पाळले तर कोरोनाची साथ रोखू शकू. यापूर्वी गावोगावच्या सरपंचानी कोरोनाच्‍या साथीला आपल्या गावात येऊ देण्यापासून प्रयत्नपूर्वक रोखले आहे. आता जिल्ह्यातील प्रत्येक सरपंचाने एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने ही मोहीम राबवताना व गाव-परिवारांना आरोग्यसंपन्न करावे. आपल्या गावातील लोक हे मास्क घालताहेत का, सुरक्षित अंतराचे पालन, हात धुणे हे नियम पाळण्यास लोकांना बंधनकारक करावे, त्रास झाल्या अंगावर काढू नका. या संसर्गाची भिती बाळगू नका जिल्हयात आरोग्य सुविधांचे जाळे निर्माण केले आहे तातडीने जावून नागरीकांनी उपचार घेऊन स्वत:ची आणि आपल्या परिवारासह इतरांचा यापसून बचाव करावा असे सांगितले.

ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यासाठीच्या विकासकार्यात आपल्याला सतत पाठींबा देण्याची भूमिका राहिली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये पर्यंत प्रत्येक बाबीत आपण सुसज्ज आहोत, कोरोनापासून बचावासाठी आतापर्यंत ८१ हजार नागरिकांच्या स्वॅब व अँन्टिजन तपासण्या केल्या आहेत, तर उपचार घेऊन आपल्या जिल्हयातील साडेचार हजारहून अधिक नागरीक बरे झाले आहेत. यासाठी कोविड योद्धे रात्रं-दिवस कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करणे मी कर्तव्य समजतो असे मंत्री श्री. मुंडे म्हणाले.

कोरोना आपत्तीच्या काळातही लोकहिताचे निर्णय घेत आहोत. अनुसूचित जातीचा आर्थिक व सामाजिकस्तर उंचावण्यासाठी शासन काम करत आहे. जिल्ह्यातील पिकविम्याचा प्रश्न सुटल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल साडे सतरा लाख विमा प्रस्ताव दाखल करून राज्यात अव्वल स्थान मिळवले. पण अनेक सर्वसामान्य शेतकरी पिककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रसंगी बँकांविरुद्ध कारवाई करू, मात्र एकही पात्र शेतकरी पिककर्जापासून वंचित राहणार नाही असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.भारतीय स्वातंत्र्यानंतर हैद्राबाद मुक्तीसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला यामध्ये बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र विठ्ठलराव काटकर हुतात्मा झाले याचा बीड जिल्ह्यातील नागरीक म्हणून मला अभिमान वाटतो अशी भावना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवर व निमंत्रितांची भेट घेऊन पालक मंत्री श्री.मुंडे यांनी सदिच्छा दिल्या.

याप्रसंगी पोलिस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रंगनाथ भिंगारे यांचा नक्षलविरोधी गडचिरोली येथील उल्लेखनीय सेवेबद्दल बोधचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पणराज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रियदर्शनी उद्यान बीड येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या सशस्त्र पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.याप्रसंगीआमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह उपस्थित पदाधिकारी अधिकारी व मान्यवरांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *