‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

सावित्रीबाईंबद्दल आक्षेपार्ह लिखाण; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई पोलिस आयुक्तांची भेट

मुंबई, ३१ मे    / प्रतिनिधी :-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच  ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

सावित्रीबाईंबद्दल आक्षेपार्ह लिखाण; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई पोलिस आयुक्तांची भेट

मुंबई :-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज  मुंबईच्या पोलिस आयुक्ताची भेट घेऊन ‘इंडिक टेल्स’ या संकेतस्थळावर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला असल्याचं निदर्शनास आणून दिले. तसेच शिष्टमंडळाने या संकेतस्थळावर कारवाई करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासारख्या महत्वाच्या नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

image.png

या प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या वाढली असल्याचं मी पहिल्यापासून सांगतो. आता तर याबाबत कहर झाला आहे. ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ यांच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लख केला आहे. तो इतका की मी इथे सांगू शकत नाही. सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत गरळ ओकण्याचे काम केले  जाते . याचा तपास केला पाहिजे. इतरांच्या बाबतीत कोणी काही बोलल तर तुमची यंत्रणा लगेच कामाला लागते. पण हे त्यापेक्षा कितीतरी जास्त महत्वाचं असल्याचं मी सीपींना सांगितले “, असे  आजित पवार यांनी सांगितले . तसेच सीपींनी वेळ मागितला असून या वेबसाईटवर हे लिखाण करण्यासाठी कुणी प्रवृत्त केले  या मागचा सुत्रधार कोण आहे. हे शोधून काढण्याची विनंती सीपींना केली असल्याचे ही ते म्हणाले.

याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, “बहुतेक ठिकाणी होणारा महापुरुषांचा अपमान हा राज्यकर्तेच करत आहेत. कायदा सुव्यस्था टिकवणं त्यांचं काम आहे. याची सुरुवाती मागच्या राज्यपालांनी केली. आत्ताच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी त्यात भर घातली. सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी काही भर घातली. महाविकास आघाडीने त्याबद्दल मोर्चा काढला होता. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे. असं वक्तव्य करता कामा नये, असा संदेश त्यातून सगळ्यांना गेला पाहिजे”, अशी टीका अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली आहे.

महाराष्ट्र सदनमध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्याच्या प्रकाराविषयी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांनी सावरकरांच्या बाबतीतला एक कार्यक्रम दिल्लीत घेतला. छगन भुजबळांचं महाराष्ट्र सदन निर्मितीत मोठं योगदान आहे. योग्य जागा निवडून पुतळे बसवण्यात आले आहेत. ते अर्धपुतळे बाजुला केले जात आहेत. नंतर सरकारकडून त्यामागचा हेतू वेगळा होता, भावना दुखवायच्या नव्हत्या असं वक्तव्य केलं गेलं. मग पुतळा हलवला कशाला?” असा सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

महापुरुषांबाबत वेगळ काही केलं तर जनता खपवून घेत नाही, हे प्रशासनाला माहिती आहे. मग ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं आहे. त्याचं नाव समोर आणून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

image.png

मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष सुनिता शिंदे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.