लग्नात संतोष बांगर यांना पाहताच 50 खोकेच्या घोषणा

हिंगोली,​३​१ मे / प्रतिनिधी :-एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठ भगदाड पाडत बंड केलं. यापुर्वी येवढ मोठ बंड शिवसेनेत कधीही घडलं नव्हतं. शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यभरातून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. ठाकरे गटाने तर शिंदे गटाला धारेवरच धरलं. यावेळी शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांनी खोक्यांमुळे गद्दारी केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून केला गेला. यावेळी शिंदे गटाला डिवचण्यासाठी ठाकरे गटाने पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा देखील दिल्या. अधिवेशन काळात विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून विरोधकांनी पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा देत बंडखोर आमदारांना हैराण करुन सोडलं होतं. यानंतर ही घोषणा वाऱ्यासारखी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली.

या घोषणांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या चांगलंच नाकीनऊ आणल्याचे दिसून येत आहे. सोमवारी एका लग्नात शिंदे गटाचा आमदार पाहून लोकांनी पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषण दिल्याने आमदाराचा चेहरा चांगलाच पडला होता. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी एका लग्नाला हजेरी लावली. या लग्नात परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव हे आधीपासूनच उपस्थित होते. बांगर यांनी लग्न मंडपात येताच जाधव यांचा चरणस्पर्श केला. यावेळी लग्नात हजर असलेल्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके, एकदम ओक’च्या घोषणा दिल्याने लग्नात एकच गोंधळ निर्माण झाला.

बांगर लग्नात येताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणेसह ‘बॉस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे यांचा विजय असो, अशी घोषणाबाजी सुरु झाली. यावेळी संतोष बांगर यांचा चेहरा पु्रता पडला होता. मात्र, यावेळी बांगर यांनी एका शब्दाने घोषणा देणाऱ्यांना हटकले नाही. अचानक घडलेल्या या प्रकरामुळे वधू आणि वर पित्याची चांगलीच अडचण झाली. त्यामुळे त्यांनी वऱ्हाडी मंडळींच्या मदतीनं या कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर या घोषणा थांबल्या.