गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा ; पोलिस अधीक्षक कलवानिया यांची कारवाई

स्थानिक पोलिसांना भनक न लागू देता पथकाची कारवाई ; दोन हायवा जप्त 

वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैध उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी अक्षरक्ष हैदोस घातला आहे. याविषयी तोंडी, लेखी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने या भागातील ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनावर विश्वास न दाखवता थेट जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकाकडे लाइव्ह वीडियोद्वारे गोदापात्रात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाची ‘पोलखोल’ करून तक्रार केल्यानंतर  जिल्हा पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी स्थानिक महसूल व पोलिसांना भनक लागू न देता गुरुवारी मध्यरात्री अचानक आपले विशेष पथक पाठवून तब्बल 45 लाखांची मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, वाळू माफियांसमोर येतील प्रशासन आर्थिक हितसबंध व दहशतीमुळे हतबल झाल्याची चर्चा आहे.

गोदावरी वाळुपट्ट्यांचे लिलाव, रॉयल्टी, नियम, अटी, शर्ती सर्वकाही कागदावर शोभून दिसते. प्रत्यक्षात सबंध यंत्रणा या माफियांनी खिशात घातली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांनी पुरणगाव, बाभुळगाव, डागपिंपळगाव व नागमठाण येथील गोदापाञात धुडगूस घातला असून राञंदिवस वाळूचा बेसुमार उपसा सुरु आहे. हप्तेखोरीच्या माध्यमातून वाळू माफियांनी चक्क गोदावरी पाञावर कब्जा केला आहे. माफिया गोदाकाठच्या ग्रामस्थांचा विरोधही जुमानायला तयार नाही.त्यामुळे येथील ग्रामस्थ आता गोदा पात्रात सुरु असलेल्या वाळू उपसाची ‘पोलखोल’ वीडियो तयार करून थेट जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यंच्याकडे तक्रार करत आहे.त्यामुळेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या तक्रारीची दखल घेत येथील स्थानिक पोलिसांना कोणतेही भनक न लावू देता आपले विशेष पथक पाठवून गुरुवारी रात्री वाळूचे दोन हायवा जप्त करत 45 लाखांची कारवाई केली. ही कारवाई विरगाव पोलिस ठण्याच्या हद्दित झाल्याने येथील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

वाळू माफियांची दहशत

गोदा पात्रात वाळू माफियांची कशी दहशत चालते याचे ताजे उदाहरण दोन दिवसापूर्वी डागपिंपळगाव शिवारात बघयला मिळाले. विरगाव पोलिसांनी वाळू तस्करी करणारा ट्रेक्टर पकडला असताना.यावेळी वाळू तस्कराने ट्रेक्टर सोडविण्यासाठी फिल्मी स्टाइल राडा घालत चक्क पोलिसांनाच दमबाजी केल्याची पोलिस कर्मचाऱ्यात जोरदार चर्चा आहे. याविषयी विरगाव येथील ठाणे प्रमुख शरदचंद्र रोडगे यांना माध्यमांनी विचारले असता असे काही झालेच नाही असे उत्तर त्यांनी दिले.