संसद इमारतीच्या उद्घाटनावरून वादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विरोधी पक्षांवर जोरदार टीका

नवी दिल्ली, दि. २५ मे/प्रतिनिधीः- संसदेच्या नव्या इमारतीच्या २८ मे रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्याच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियात भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि सत्ताधारी व विरोधी पक्षांचे संसद सदस्य उपस्थित होते.

जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया देशाच्या दौऱ्यावरून परतल्यावर भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, “तुम्हा सगळ्यांना हे माहीत करून घ्यायला आनंद वाटेल की, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अन्थोनी अल्बनीज हे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
एवढेच नाही तर त्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे संसद सदस्यदेखील उपस्थित होते. भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात प्रत्येकजण सहभागी होता. ही घटना काही मोदीच्या प्रसिद्धीची नव्हती तर भारताचे प्रयत्न आणि १४० कोटी भारतीयांचे चैतन्य त्यामागे होते. लोकशाहीची शक्ती आहे ती ही,” असेही मोदी म्हणाले.

दि. २८ मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभावर १९ विरोधी पक्षांनी घातलेल्या बहिष्काराच्या घोषणेनंतर मोदी यांनी वरील भाष्य केले. “लोकशाहीचा आत्मा जेव्हा संसदेतून काढून घेतला जातो तेव्हा नव्या इमारतीचे आम्हाला काहीही महत्व राहात नाही म्हणून आम्ही नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन समारंभावर सामुहिकपणे बहिष्कार घातल्याचे जाहीर करीत आहोत,” असे विरोधी पक्षांनी बुधवारी निवेदनात म्हटले होते.

आत्मविश्वासाने बोला

काँग्रेस आणि भाजप यांच्यात उद्घाटनाच्या मुद्यावरून जोरदार शा‍ब्दिक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आमच्या धार्मिकस्थळांवर होणारे हल्ले आम्ही सहन करणार नाही, असे मी लक्षात आणून दिल्यावर जगाला माझे म्हणणे पटले, असे मोदी यांनी लक्षात आणून दिले. मोदी म्हणाले, “भारताच्या महान परंपरा आणि संस्कृतीबद्दल बोलताना कधीही गुलामगिरीच्या मानसिकेत बुडून जाऊ नका तर आत्मविश्वासाने बोला, असे मला तुम्हाला सांगायचे आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले. “जपानमध्ये हिरोशिमात महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले गेले तेव्हा बापूंचा संदेश पसरवण्यास भारत सक्षम होता हे दिसल्याचे मोदी यांनी ठासून सांगितले.
“जपानच्या पंतप्रधानांना ते भारत भेटीवर आले तेव्हा मी बोधी वृक्षाचे रोप दिले होते. अणुबाँब टाकला गेला होता त्या हिरोशिमात हे रोप मी लावले ते शांततेचा संदेश देण्यासाठी, असे ते म्हणाले होते,” अशी आठवण मोदी यांनी यावेळी सांगितली.

हा देश बुद्धाचा, गांधींचा

कोरोना महामारी अगदी वेगात असताना कोविड लसीची निर्यात करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेला पंतप्रधानांनी उत्तर देताना म्हटले की,” संकटाच्या वेळी विरोधकांनी विचारले की, जगाला मोदी लस का देत आहेत. हे लक्षात घ्या की, हा देश बुद्धाचा आहे. हा देश महात्मा गांधींचा आहे. आम्ही तर आमच्या शत्रूचीही काळजी करतो, करूणेची प्रेरणा मिळालेले आम्ही लोक आहोत. आम्ही पुढे जाऊ शकतो ते फक्त याच पद्धतीने.”

ऑस्ट्रेलियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात मला जो काही वेळ मिळू शकला त्याचा उपयोग देशाचे चांगल्या मार्गांनी, जास्तीतजास्त चांगले निर्णय घेऊन भले होण्यासाठी केला, असे ते म्हणाले. माझ्या या विदेश दौऱ्यात मी भारतीयांच्या सामर्थ्याची चर्चा केल्याचे ते म्हणाले.
सामर्थ्याबद्दल विदेशात बोलतो

“माझ्या भेटींमध्ये मी तुम्ही करीत असलेले प्रयत्न, तुमची परंपरा मी जगाला सांगत असतो. मी जगात जातो ते फक्त तुमच्या सामर्थ्याचे गीत गाण्यासाठी. जगातील महान लोकांची भेट घेताना मी भारताच्या सामर्थ्याबद्दल बोलतो आणि भारताच्या युवक पिढीच्या गुणवत्तेबद्दल. भारतीय युवक त्यांना जेव्हा संधी मिळते तेव्हा ते जे सामर्थ्य दाखवतात ते मी बोलतो,” असेही ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला २० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते.