केजरीवाल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई, २५ मे  / प्रतिनिधी :-आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या देशभर फिरुन विरोधकांची मोठ बांधताना दिसत आहेत. सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारमधील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचे सर्व अधिकार हे दिल्ली सरकारला दिले होते. केंद्र सरकारने मात्र न्यायालयाच्या आदेशावर अध्यादेश काढत तो लोकसभेत पारित करुन न्यायालयाचा निर्णय रद्द केला. केंद्र सरकारचा अध्यादेश लोकसभेत जरी पास झाला असला तरी, राज्यसभेत त्याला आव्हान देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देशभर फिरुन भाजपविरोधातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन राज्यसभेत त्यांचे समर्थन मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत.
या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे नेते संजय सिंह आणि राघव चड्डा हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील सुनील तटकरे यांच्यासह इतर नेत्यांची देखील यावेळी उपस्थिती होती.

यावेळी केजरीवाल यांनी शरद पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पवार यांनी केंद्राने न्यायालयाच्या निर्णयावर अध्यादेश आणून चुकीचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाला राष्ट्रवादी संसदेत विरोध करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी बोलताना केजरीवाल यांनी केंद्रसरकारवर टीका केली. दिल्लीच्या लोकांच काम सरकारने केले पाहिजे. मात्र, केंद्र सरकार दिल्लीच्या सरकारच्या अधिकारांवरच गदा आणत असल्याचे ते यावेळी म्हणाले. राज्यसभेत या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले आहे. तसेच ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन राज्यातील विरोधी पक्षाची सरकारे पाडली जात आहेत, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.राज्यसभेत विरोधी पक्षांनी आपल्याला सहकार्य करावे. लोकसभेत पास झालेल्या हा अध्यादेश राज्यसभेत रद्द करण्यासाठी केजरीवाल यांच्याकडून विरोधकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. याच निमित्ताने केजरीवाल दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर काल (24 मे) त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

केजरीवाल यांनी यापूर्वी पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेऊन पाठींबा मिळवला होता. तसेच त्यांनी बिहाचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची देखील भेट घेतली होती.