एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातात सहा मृत्युमुखी; दहा जण जखमी

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये

सिंदखेडराजा ,२३ मे  / प्रतिनिधी :-बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे पळसखेडी चक्का गावाजवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील ६​ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी पुणे-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला.आज सकाळी पुणे ते मेहकर एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये तत्काळ द्यावेत तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या अपघाताविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याचे निर्देश दिले.

महामार्गावर आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास कंटेनरने एसटी बसला समोरून भीषण धडक दिली. धडकेमुळे बसचा समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला. बसचे वरील पत्रेही उडाले. त्यामुळे बसमधील समोरील 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, 10जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का गावाजवळ हा अपघात झाला.

अपघातातील सर्व जखमींना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच घटनास्थळी पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. दरम्यान, मृतांमध्ये बसचालकाचाही समावेश आहे. जखमींमध्ये दुसरबीड येथील काही जणांचा समावेश असल्याची माहिती आहे.

अपघातात कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी काही वेळाने वाहतूक सुरळीत केली.